| माणगाव | प्रतिनिधी |
माणगावसारख्या शांत, लहानशा शहरातून मोठं स्वप्न घेऊन निघालेल्या अतुल विरकर यांचा प्रवास आज उदयोन्मुख कलाकार म्हणून सर्वांना प्रेरणा देणारा ठरत आहे. ‘अभिनय’ या एकाच ध्यासाने त्यांनी सुरू केलेली वाटचाल आज छोट्या पडद्यावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे.
लहानपणापासूनच अतुल विरकर यांना अभिनय आणि नृत्याची विलक्षण आवड आहे. स्थानिक स्नेहसंमेलन, नवरात्र, गणेशोत्सव अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ते नियमित भाग घेत असत. अशोक दादा साबळे विद्यालयातील रंगभूमीनेच त्यांच्या कलागुणांना पहिले व्यासपीठ दिले. परंतु, त्यांच्या मनात एकच जिद्द होती की, मोठे काहीतरी करायचे आहे. त्यावेळी त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. आई-वडिलांच्या निधनानंतर अतुल यांच्यावर संकटांचे डोंगर कोसळले. त्यांना राहायला स्वतःचे घर नव्हते; भाड्याच्या छोट्याशा खोलीतून आयुष्याचा प्रवास पुढे सुरू होता. उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्यासाठी ते सत्यनारायण पूजेसाठी भटजी म्हणून काम करू लागले. परंतु, मनाचा एक कोपरा सतत चित्रपट आणि मालिकांच्या जगाकडेच ओढला जात होता. शेवटी मनातली स्वप्ने घेऊन ते मुंबईत पोहोचले. तेथून त्यांचा खरा संघर्ष सुरू झाला. कामाच्या शोधात दिवस-रात्र भटकंती, ऑडिशन्स, नकार, निराशा, अशा परिस्थितीत त्यांनी प्रयत्नांची साथ कधीही सोडली नाही. 1999 साली ज्येष्ठ अभिनेते अशोक शिंदे यांनी अतुलची कला आणि आवड ओळखली. त्याच्या जीवनातील ही पहिली मोठी संधी ठरली. सिनेमातील छोटंसं पात्र असो किंवा मालिकेतील छोटेखानी भूमिका, अतुल यांनी त्या प्रत्येक भूमिकेत स्वतःची छाप सोडली. याच मेहनतीने त्यांनी पुढील मार्ग प्रशस्त केला. अनेक लोकप्रिय मालिकांमधून दमदार अभिनय केला. त्यांनी हिन्दी आणि मराठी या दोन्ही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली. अशोक सराफ, निलेश साबळे, अशोक शिंदे, रवि जाधव, विजय कदम, भाऊ कदम यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधीही अतुल यांना मिळाली.
गाजलेल्या मालिका
तारक मेहता का उल्टा चष्मा (सब टीव्ही), चिडियाघर (सब टीव्ही), सावधान इंडिया/सावध भारत (स्टार भारत), क्या हाल है श्रीमान पाँचाल (स्टार भारत), उडान (कलर्स), अनुपमा (स्टार प्लस), या हिंदी मालिंसह मराठीतील अप्पी माझे कलेक्टर, कुलवधू, किमयागर, शेजारी शेजारी पक्के शेजारी, माझा नवऱ्याची बायको, मालवणी दिवस, मधु इथे आणि चंद्र तिथे, राधा प्रेम रंगी रंगीली व या गोजिरवाण्या घरात अशा त्यांच गाजलेल्या मालिका आहेत. सध्या कलर्स मराठीवरील ‘अशोक मामा’ मालिकेत त्यांचा प्रभावी अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. त्याचबरोबर कुमारी गंगुबाई नॉन मॅट्रिक, शिनेमा, अरे बाबा पुरे, 1234 अशा मराठी सिनेमात अतुल यांनी काम केले आहे. त्यांना खरी ओळख ‘चला हवा येऊ द्या’ आणि ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ यामधील अभिनयाने मिळवून दिली.
