| मुंबई | प्रतिनिधी |
महिला प्रीमियर लीगच्या लिलावाची तारीख अखेर ठरली. बीसीसीआयने येत्या 13 फेब्रुवारीला जिओ वर्ल्ड कनव्हेशन सेंटरमध्ये महिला प्रीमियर लीगच्या लिलावाचे आयोजन केले आहे. यात एकूण 409 महिला क्रिकेटपटूंचा लिलाव होणार आहे. पहिली वहिली महिला प्रीमियर लीग ही 4 ते 26 मार्च दरम्यान मुंबईत होणार आहे. महिला प्रीमियर लीगचा पहिला हंगाम आयोजित करण्याचा मान हा मुंबईला मिळणार आहे. हंगामातील पहिला सामना हा गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स या फ्रेंचायजींच्या संघात होण्याची शक्यता आहे.
महिला प्रीमियर लीग 4 ते 26 मार्च दरम्यान मुंबईत खेळली जाणार आहे. पहिल्या हंगामासाठी क्रिकेटपूंचा लिलाव हा महिला टी 20 वर्ल्डकप 2023 मधील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यानंतर होणार आहे. – अरूण धुमल, आयपीएलचे अध्यक्ष
13 फेब्रुवारीला मुंबईत हा लिलाव पार पडणार आहे. बीसीसीआयने पाच संघाच्या लिलावातून 4669.99 कोटी रूपये कमावले आहेत. तर लीगच्या प्रसारण हक्काचा लिलाव करून त्यातून 951 कोटी रूपये कमावले. महिला लीगच्या लिलावात एकूण 409 महिला खेळाडू भाग घेणार आहेत. एकूण 1525 खेळाडूंनी यासाठी नोंदणी केली होती. त्यातील 409 खेळाडूंची अंतिम यादी निश्चित करण्यात आली आहे. 409 खेळाडूंपैकी 246 खेळाडू हे भारतीय आहेत तर 163 खेळाडू विदेशी आहेत. 8 खेळाडू हे सहयोगी देशांमधील आहेत. 409 खेळाडूंपैकी 202 खेळाडू कॅप्ड आहेत 199 अनकॅप्ड आहेत. पाच संघासाठी जास्तीजास्त 90 स्लॉट उपलब्ध आहेत. यातील 30 स्लॉट हे विदेशी खेळाडूंसाठी आहेत. सर्वाधिक 50 लाख रिझर्व प्राईस श्रेणीत 24 खेळाडूंचा समावेश आहे. यात हरमप्रीत कौर, स्मृती मानधना, दिप्ती शर्माचा समावेश आहे.