पुरातत्व विभागाचा अभिनव उपक्रम
| मुरुड | प्रतिनिधी |
मुरुड तालुक्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक गोल घुमट येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना इतिहासाची माहिती मिळावी, यासाठी पुरातत्व विभागाने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. पर्यटकांसाठी क्युआर कोड मोबाईलवर स्कॅन करून ऑडिओ गाईडची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. अशी माहिती पुरातत्व विभागाचे साहाय्यक संवर्धक प्रकाश घुगरे यांनी दिली.
मुरूड तालुक्यात राजपुरी ग्रामपंचात हद्दीत ऐतिहासिक खोकरीचे गुंबज गोल घुमट आहेत. या नवाबकालीन ऐतिहासिक वारसा स्थळाला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात. मात्र गाईड उपलब्ध नसल्याने त्यांना या वारसा स्थळाची अचून माहिती उपलब्ध होऊ शकत नव्हती. पुरातत्व विभागाच्या माहिती फलकांवर उपलब्ध माहितीच या पर्यटकांना मिळत होती. ही बाब लक्षात घेऊन पुरातत्व विभागाने खोकरीचे घुमट येथे आता ऑडीओ गाईड सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
त्यामुळे मुरुड जंजिरा किल्ल्यापाठोपाठ आता खोकरी घुमटांची माहिती ऑडीओ गाईड स्वरुपात उपलब्ध झाली आहे. क्यूआर कोड स्कॅन करून ही सुविधा येणार सर्व पर्यटकांना उपलब्ध होणार आहे. नुकताच या सुविधेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी खोकरी गुंबड ई-वॉक ऑडिओ गाईडचे उपअधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ. ए.व्ही. नागानूर, सहाय्यक अधीक्षक पुरातत्वशास्त्रज्ञ शेख मुहिब, संवर्धन पुरातत्वशास्त्रज्ञ राजेश दिवेकर, संशोधन सहाय्यक किन्नरी पोलाडिया, पुरातत्व सहाय्यक संवर्धक बजरंग येलीकर, पुरातत्व बहुउद्देशीय कर्मचारी प्रकाश घुगरे यावेळी उपस्थित होते.







