। सिडनी । वृत्तसंस्था ।
पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली खेळणार्या ऑस्ट्रेलियाने पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडला 146 धावांनी धूळ चारून अॅशेस मालिकेत 4-0 असे यश संपादन केले. इंग्लंडचा दुसरा डाव 124 धावांत संपुष्टात आणून ऑस्ट्रेलियाने तिसर्या दिवशीच ही लढत जिंकली. शनिवारच्या 3 बाद 37 धावांवरून पुढे प्रारंभ करताना मार्क वूडच्या (6/37) भेदक गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 155 धावांत आटोपला. परंतु पहिल्या डावातील 115 धावांच्या आघाडीमुळे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडपुढे विजयासाठी 271 धावांचे लक्ष्य ठेवले.
होबार्ट येथे झालेल्या या लढतीत इंग्लंडने दुसर्या डावात 16 षटकांत बिनबाद 68 अशी दमदार सुरुवात केली. परंतु कॅमरून ग्रीनचे (3/21) गोलंदाजीसाठी आगमन होताच इंग्लंडचा डाव घसरला. त्याने झॅक क्रॉली (36), रॉरी बन्र्स (26) आणि डेव्हिड मलान (10) या आघाडीच्या तीन फलंदाजांना सहा षटकांच्या अंतरात माघारी पाठवले. मग स्कॉट बोलंड आणि कमिन्स यांनीही प्रत्येकी तीन बळी मिळवून इंग्लंडला अखेरच्या सत्रातील दोन तासांच्या अंतरात 38.5 षटकांत गुंडाळले. कमिन्सने ओली रॉबिन्सनचा शून्यावर त्रिफळा उडवून ऑस्ट्रेलियाच्या विजयावर थाटात शिक्कामोर्तब केले. पहिल्या डावात शतक झळकावणारा ट्रॅव्हिस हेड सामनावीर ठरला. तसेच मालिकेत दोन शतकांसह सर्वाधिक 357 धावा केल्यामुळे त्यालाच मालिकावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले.