| डार्विन | वृत्तसंस्था |
दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला डार्विन टी-20 सामन्यात 53 धावांनी पराभूत केले. मालिकेत आता 1-1 अशी बरोबरी झाली असून, तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयामुळे ऑस्ट्रेलियाची अपराजित मालिका खंडितही झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून, टी-20 मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसरा सामना डार्विनला मंगळवारी (दि.12) पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने यजमान ऑस्ट्रेलियाला 53 धावांनी पराभूत करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे आता तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेसाठी युवा डेवाल्ड ब्रेव्हिस विजयाचा नायक ठरला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 219 धावांचे लक्ष्य ठेवले होते. परंतु, या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 17.4 षटकातच 165 धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेल्या टीम डेव्हिडने या सामन्यातही मोलाचे योगदान दिले. मात्र, त्याला कोणाची साथ मिळाली नाही. पहिल्या सामन्यात त्याने ऑस्ट्रेलियाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला होता; परंतु, त्याला दुसऱ्या सामन्यात बाकी खेळाडूंकडून साथ मिळाली नाही. त्यामुळे अखेर ऑस्ट्रेलियाची टी-20 क्रिकेटमधील अपराजित राहण्याची मालिका 10 व्या सामन्यात खंडित झाली. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाने सलग 9 टी-20 सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता.







