ऑस्ट्रेलियाची पाकिस्तान विरुद्ध विजयी आघाडी


| मेलबर्न | वृत्तसंस्था |

कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 79 धावांनी पराभव केला. या मालिकेतील ऑस्ट्रेलियाचा हा सलग दुसरा विजय आहे. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. मेलबर्न येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 318 धावा आणि दुसऱ्या डावात 262 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने पहिल्या डावात 264 धावा आणि दुसऱ्या डावात 237 धावा केल्या. या सामन्यासाठी पॅट कमिन्सला ‌‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून निवडण्यात आले. कमिन्सने एकूण 10 फलंदाज बाद केले.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 318 धावा केल्या होत्या. यादरम्यान लाबुशेनने 155 चेंडूंचा सामना करत 63 धावा केल्या. लाबुशेनच्या या खेळीत 5 चौकारांचा समावेश होता. सलामीवीर उस्मान ख्वाजाने 42 आणि डेव्हिड वॉर्नरने 38 धावांचे योगदान दिले. मिचेल मार्शने 41 धावा केल्या. यादरम्यान पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना जमालने 3 फलंदाज बॅड केले . त्याचबरोबर शाहीन आफ्रिदी, मीर हमजा आणि हसन अली यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. पाकिस्तानने पहिल्या डावात सर्वबाद 264 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये मसूदने अर्धशतक झळकावले. त्याने 54 धावा केल्या. बाबर आझम या डावात फ्लॉप ठरला. तो एक धावा करून बाद झाला. रिझवानने 42 धावांची तर शफीकने 62 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना कर्णधार कमिन्सने 5 फलंदाजांना तंबूचा रास्ता दाखवला.त्याने 20 षटकांत 48 धावा दिल्या. नॅथन लायनने 4 गडी बाद केले .

मिचेल मार्शने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियासाठी शानदार फलंदाजी केली. त्याने 130 चेंडूंचा सामना करत 96 धावा केल्या. मार्शने या खेळीत 13 चौकार मारले. ॲलेक्स कॅरीने 53 आणि स्टीव्ह स्मिथने 50 धावा केल्या. यादरम्यान पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना शाहीन आफ्रिदी आणि मीर हमजा यांनी प्रत्येकी 4 फलंदाज बाद केले. तसेच जमालने 2 गड्यांना माघारी धाडले . पाकिस्तानला विजयासाठी 317 धावांची गरज होती. मात्र 237 धावा करून संघ सर्वबाद झाला. या डावात शान मसूद 60 धावा करून बाद झाला. त्याने 7 चौकार मारले. बाबर आझमने 41 धावांची खेळी केली. रिझवानने 35 धावांचे योगदान दिले. या मालिकेतील पाकिस्तान संघाचा हा सलग दुसरा पराभव आहे. कमिन्सने 18 षटकात 49 धावा देत 5 गडी बाद केले . त्याने या सामन्यात एकूण 10 विकेट्स घेतल्या.

Exit mobile version