| चिरनेर | प्रतिनिधी |
रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालय महालण विभाग फुंडे, उरण येथील एफ.वाय.बी.एस.सी.आय.टी. ची विद्यार्थिनी अवनी अलंकार कोळी हिची 14 ते 24 ऑगस्ट 2025 दरम्यान कझाकिस्थानमध्ये होणाऱ्या आशियाई शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
रायगड आणि नवी मुंबई विभागातून राष्ट्रीय संघात निवड होणारी पहिली महिला नेमबाज म्हणून अवनी कोळीचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिले जात आहे. राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्यामुळे अवनी कोळीचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.
2023 मध्ये बालेवाडी, पुणे येथे डबल ट्रॅप शिकून तिने महाराष्ट्र टीममध्ये प्रवेश मिळवला. 2024-25 मध्ये नेमबाजीच्या क्षेत्रामध्ये दोन राष्ट्रीय सुवर्णपदकांची कमाई करून तिने स्वतःचे स्थान पक्के केले.
नेमबाजीच्या क्षेत्रात अवनी कोळीला मिळालेल्या या घवघवीत उल्लेखनीय यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष पी.जे.पाटील, कॉलेज विकास समितीचे अध्यक्ष बाळाराम पाटील, जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समिती सदस्य सुधीर घरत, विकास समिती सदस्य भावना घाणेकर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर व सर्व सेवकांनी अभिनंदन केले तसेच स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.







