| मुंबई | प्रतिनिधी |
राष्ट्रीय जलतरण मुंबईतील प्रबोधन गोरेगाव संस्थेतर्फे चालविण्यात येणाऱ्या ओझोन स्विमिंग पूल ॲकॅडमीची खेळाडू अवंतिका देसाई हिने चमकदार कामगिरी केली आहे. बंगळुरू येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करताना फ्री स्टाईल रिले प्रकारात तिने रौप्यपदक पटकावले आहे. प्रबोधन गोरेगाव संस्थेच्या इतिहासात हे प्रथमच घडल्याने संस्थेला राष्ट्रीय जलतरण स्पर्धेच्या विश्वात मानाचे आणि अभिमानास्पद स्थान प्राप्त झाले.
अवंतिका देसाई ही माजी आमदार नीला देसाई यांची नात आणि प्रबोधन गोरेगाव संस्थेचे कार्यकारिणी सदस्य अमित देसाई यांची कन्या आहे. हे स्थान प्राप्त करण्यासाठी अवंतिकाची प्रचंड मेहनत, ऑलिम्पिक खेळाडू आणि प्रशिक्षक रॉन डिसोझा यांचे उत्कृष्ट प्रशिक्षण आणि कुटुंबियांनी तिच्यासाठी दिवसरात्र केलेले प्रयत्न यांचा मोलाचा वाटा आहे. अवंतिकाच्या या कामगिरीसाठी प्रबोधन गोरेगाव संस्थेसह समस्त गोरेगावकरांनीही तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.







