स्मार्ट मीटरच्या सक्तीवर ग्राहक संघटनेचा आक्षेप
| रसायनी | प्रतिनिधी |
महावितरणकडून घरगुती वीज ग्राहकांना प्रत्यक्ष मीटर रीडिंग न घेता सरासरी बिल आकारले जात असल्याच्या तक्रारी वाढत असून, ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून काही ग्राहकांना अपेक्षेपेक्षा जास्त रकमेची बिले मिळत असून, बिलाबाबत विचारणा केल्यानंतर स्मार्ट मीटर बसविण्याचा आग्रह केला जात असल्याचा आरोप महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. विजय खारकर यांनी केला आहे.
वीज बिलिंग, मीटर रीडिंग आणि ग्राहकांच्या तक्रारींबाबत महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने नियम व प्रक्रिया निश्चित केल्या आहेत. सध्या आयोगाकडे 2021 मधील इलेक्ट्रिक सप्लाय कोड आणि स्टँडर्ड ऑफ परफॉर्मन्स रेग्युलेशन तसेच त्यातील 2024 मधील सुधारणा लागू असल्याचे आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर नमूद आहे. त्यामुळे ग्राहकांनी जुन्या 2005 च्या नियमांचा संदर्भ देताना त्यांची सद्यस्थिती तपासणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष मीटर रीडिंग उपलब्ध नसताना सरासरी वापराच्या आधारे बिल आकारण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास, ग्राहकांनी बिलातील मागील आणि सध्याचे मीटर रीडिंग, वापराचे युनिट, बिलिंग कालावधी आणि मागील बिलांची नोंद तपासावी. प्रत्यक्ष वापर आणि बिलातील वापर यामध्ये मोठी तफावत असल्यास महावितरणकडे लेखी तक्रार करून त्याची पोचपावती घेणे महत्त्वाचे आहे. तसेच, स्मार्ट मीटरच्या वापराबाबत ग्राहकांना योग्य माहिती देणे आणि अधिकृत प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक असल्याची भूमिका ग्राहक संघटनेने मांडली आहे. केवळ बिलाबाबत ग्राहकाने आक्षेप घेतला किंवा तक्रार केली म्हणून त्याच्यावर दबाव आणणे अथवा वीजपुरवठा खंडित करण्याची धमकी देणे योग्य नसल्याचे ॲड. खारकर यांनी म्हटले आहे.
‘महाविरतणने तक्रारींची दखल घ्यावी’
ग्राहकांनी चुकीचे किंवा संशयास्पद बिल आल्यास मीटरचे सध्याचे रीडिंग आणि तारीख स्पष्ट दिसेल असा फोटो जतन करावा. मागील बिलांच्या तुलनेत युनिट वापराची पडताळणी करावी. महावितरणकडे लेखी तक्रार करून पोचपावती घ्यावी. संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचे नाव, पद आणि तक्रारीचा क्रमांक नोंदवून ठेवावा. बिलात प्रत्यक्ष वापरापेक्षा जास्त युनिट दाखविल्याचे आढळल्यास त्याबाबत लेखी हरकत नोंदवावी. तक्रारीचे निराकरण न झाल्यास उपलब्ध ग्राहक तक्रार निवारण यंत्रणेकडे दाद मागावी. महावितरणने या तक्रारींची दखल घेऊन प्रत्यक्ष मीटर रीडिंग, बिलिंगमधील तफावत आणि स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया याबाबत ग्राहकांना स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी ग्राहक संघटनांनी केली आहे.
ग्राहकांनी घाबरून न जाता आपल्या बिलाची आणि मीटर रीडिंगची नोंद ठेवावी. चुकीचे बिल आकारले जात असल्यास त्याविरोधात लेखी तक्रार करून कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा. स्मार्ट मीटर किंवा बिलिंगच्या प्रक्रियेत ग्राहकांवर कोणत्याही प्रकारचा अनुचित दबाव आणला जाऊ नये.
– ॲड. विजय खारकर, जिल्हाध्यक्ष,
महाराष्ट्र वीज ग्राहक संघटना
