रायगड लोकसभा मतदारसंघात सरासरी 58 टक्के मतदान

अनंत गीते, सुनील तटकरेंसह 11 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद

| रायगड | खास प्रतिनिधी |

तिसर्‍या टप्प्यातील रायगड लोकसभा मतदारसंघात किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे 50.31 टक्के मतदान झाले. सायंकाळी सहा वाजेपर्यंतचा अहवाल रात्री उशिरा प्राप्त होणार असल्याने जिल्ह्यात सरासरी 58.10 टक्के मतदान होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. इंडिया आघाडीतील शिवसेनेचे (ठाकरे गट) अनंत गीते आणि महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) सुनील तटकरे या दिग्गजांसह अन्य 11 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. मतमोजणी आता 4 जून रोजी पार पडणार आहे.

महाड तालुक्यातील किंजलोळी दाभेकरकोंड येथील मतदान करण्यासाठी जात असताना एकचा मृत्यू झाला. तसेच, पेण तालुक्यातील तब्बल दहा मतदान केंद्रांवरील सहा हजार मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातला. गेल्या 15 दिवसांपासून मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडत होता. (दि.5) मे रोजी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सभेने प्रचाराची सांगता झाली. काही कालावधीसाठी आराम केल्यानंतर उमेदवारांनी छुप्या प्रचारावर जोर दिला होता.

मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून अलिबाग, पेण, महाड, श्रीवर्धन, गुहागर आणि दोपोली या सहा मतदारसंघात मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 50.31 टक्के मतदान झाले होते. सकाळी मतदारांचा उत्साह उल्लेखनीय होता. मात्र, दुपारी उन्हाचा पारा वाढल्याने मतदारांनी घरातच राहणे पसंत केले. त्यामुळे दुपारच्या कालावधीत मतदानाचा आलेख खाली आला होता. दुपारनंतर मतदारांनी पुन्हा मतदान केंद्रांवर गर्दी केली होती. अलिबाग तालुक्यातील वाघ्रण, पेण, म्हसळा, रोहा, श्रीवर्धन, महाड येथील मतदार केंद्रावर सहा वाजेपर्यंत मोठ्या संख्येने मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे मतदान उशिरापर्यंत सुरु होते. अलिबाग तालुक्यातील चौल, महाजने, रोहा तालुक्यातील धाटाव, म्हसळा तालुक्यातील मेंदडी येथे मतदान केंद्रांवर मतदान यंत्रातील किरकोळ बिघाडामुळे मतदानात व्यत्यय आला होता. धाटाव येथील मतदारांना बराच काळ ताटकळत बसावे लागल्याचे चित्र होते. अलिबाग येथील ज्येष्ठ विधीज्ज्ञ अ‍ॅड. गोपाल लिमये (93) यांनी मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

महाड तालुक्यातील किंजळोली दाभेकर कोंड येथील प्रकाश चिनकटे हे मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पायी जात असताना मतदान केंद्रापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर असताना ते चक्कर येऊन रस्त्यावर कोसळले. त्यामध्ये त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाल्याने किंजळोली दाभेकर कोंड पंचक्रोशीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. रेवदंडा मतदान केंद्रावर प्रसाद शरद गोंधळी यांनी स्वतः मतदान करतानाचे व्हिडीओ शूटिंग केले. त्यानंतर ती रिल इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप स्टेटवर प्रसारीत केली. गोंधळी यांनी गुप्त मतदान प्रक्रियेचा भंग केल्याप्रकरणी रेवदंडा पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Exit mobile version