महाराष्ट्राच्या लेकाची ‌‘सुवर्ण’धाव

अविनाश साबळेने पटकावलं सुवर्णपदक
तीन हजार मीटर स्पिपलचेसमध्ये पदकाची कमाई
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
महाराष्ट्रातील बीडच्या अविनाश साबळेने आशियाई क्रीडा स्पर्धेतील 3000 मीटर स्टिपलचेसमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदकाची कमाई केली. राष्ट्रीय विक्रमधारी 29 वर्षीय साबळेने 8:19:50 सेकंद अशी सर्वोच्च वेळ घेत भारताला स्टिपलचेस या ॲथलेटिक्समधील मैदानी क्रीडा प्रकारात दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले.

साबळेने या बळावर इराणच्या हुसैन कहानीचा 2018 मधील 8:22:79 सेकंदांचा विक्रम मागे टाकत नवा आशियाई विक्रमही आपल्या नावे केला. 2010 मध्ये महिला धावपटू सुधा सिंहने 3000 मीटर स्टिपलचेसमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते.

बीडच्या आष्टी तालुक्यातील मांडवा गावचा साबळे रहिवासी आहेत. शेतकरी कुटुंबात 13 सप्टेंबर 1994 रोजी त्याचा जन्म झाला. अविनाशचे आई-वडील शेतकरी आहेत आणि अविनाशला त्याच्या शाळेत सहा किलोमीटर चालत जावे लागत होते. अविनाशने खेळात कारकीर्द घडविण्याचा कधी विचार केला नव्हता, मात्र आज त्याने स्टीपलचेसमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला.

वयाच्या सहाव्या वर्षापासून अविनाश घरापासून सहा किलोमीटर दूर असलेल्या शाळेत चालत किंवा पळत जात असे. बारावीचं शिक्षण झाल्यावर त्याने लष्करात प्रवेश केला. अविनाश 5 महार रेजिमेंटचा जवान म्हणून 2013-14 साली सियाचेन या अतिथंड युद्धभूमीवर तैनात होता. त्यानंतर राजस्थान आणि सिक्कीममध्येही त्याने कर्तव्य बजावले.

2015 साली तो लष्कराच्या क्रॉस कंट्री शर्यतीत सहभागी झाला आणि त्याच्या ॲथलेटिक्समधल्या कारकीर्दीला सुरुवात झाली. अविनाशनं पुढे स्टीपलचेसची निवड केली आणि या स्पर्धेत वेगवेगळे राष्ट्रीय विक्रमही रचले. गेल्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये त्याचे पदक अगदी थोडक्यात हुकले होते.

लेकाकडून कष्टाचे चीज
माझं लेकरू लहानपणापासूनच जिद्दी, मेहनती आणि आत्मविश्वासाने चालणार होते. त्याने अफाट कष्ट करून सुवर्णपदक मिळवले. लहानपणापासूनच त्याला धावण्याची आवड होती. शिक्षणासाठी आणि आपली खेळातील आवड टिकवण्यासाठी त्याने कुटुंबासोबत वीटभट्टीवरही काम केले. खूप हलाखीची परिस्थिती त्याने पाहिली आहे. तो लहानपणापासूनच हुशार आहे. देशासाठी यापुढेही तो धावत राहील आणि भारताला अनेक पदके मिळवून देईल.

वैशाली साबळे (आई)

मी स्टीपलचेस शर्यतीत सोनेरी यश मिळविणार याबद्दल आत्मविश्वास होता. स्वप्न अखेर सत्यात उतरले. मी 5000 मीटर शर्यतीवरदेखील लक्ष केंद्रित करत आहे.

अविनाश साबळे
Exit mobile version