शाळा व्यवस्थापनाकडून संमतीपत्र देण्यास टाळाटाळ

विद्यार्थी वाहतूक संस्थेकडून 6 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम

| पनवेल । वार्ताहर ।

पनवेल परिसरातील विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांची ने-आण करणार्‍या स्कूल बसचे परवाने नूतनीकरण करण्यात येत नाहीत. शाळा व्यवस्थापनाकडून संमती पत्र मिळत नसल्याने ही अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितेचेचा प्रश्‍न खरोखर ऐरणीवर आला आहे. याबाबत पनवेल विद्यार्थी वाहक संस्थेने 6 डिसेंबरपर्यत अल्टिमेटम दिला आहे. याबाबत तोडगा न काढल्यास पनवेल आरटीओ समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग हुमणे यांनी दिला आहे.

पनवेल परिसरात हजारो विद्यार्थी शाळेत स्कूल व्हॅनने येतात आणि घरी जातात. या भागात मोठा प्रमाणात स्कूल व्हॅन असून त्यातुन शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो. पनवेल तसेच सिडको वसाहतीतील रस्त्यांचा विचार करत असताना अनेक ठिकाणी रोड अरुंद आहेत. तसेच दोन्ही बाजूने वाहनांची पार्किंग केल्यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येने डोके वर काढले आहे. परिणामी स्कूल बसेसमधुन विद्यार्थ्यांच्या वाहतुकीस अनुकूल अशी स्थिती नाही. स्कूल व्हॅन हा एकमेव पर्याय विद्यार्थी वाहतुकीसाठी आहे. सात अधिक एक विद्यार्थी वाहतुकीकरिता परवाना परिवहन विभागाकडून या अगोदर देण्यात आला होता. शाळेचे पत्र आल्यानंतर गेल्या दहा वर्षांमध्ये स्कूल व्हॅन परवाना परिवहन विभागाकडून नूतनीकरण करून देण्यात आला. मात्र आता पनवेल उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शाळेचे संमती पत्र बंधनकारक केले आहे. त्यामुळे परवाने नूतनीकरण रखडले आहे. या संदर्भात जिल्हा परिवहन समितीकडून सुद्धा अशा प्रकारचे संमती पत्र देण्याबाबत शाळांना सुचित केले आहे.

मात्र असे असले तरी त्यांच्याकडून सहकार्य केले जात नाही. त्यामुळे शेकडो स्कूल व्हॅनचे परवाने नूतनीकरण झाले नाहीत. त्यामुळे त्यांना इन्शुरन्स सुद्धा मिळत नाही. त्यामुळे सहाजिकच विद्यार्थ्यांची वाहतूक असुरक्षित झाली आहे. स्कूल व्हॅन चालक पेचामध्ये कोरोना वैश्‍विक संकटात जवळपास दोन वर्ष शाळा बंद होत्या. त्यावेळी स्कूल व्हॅन चालकांवर अक्षरशा उपासमारीची वेळ आली होती. यावर्षी शाळा सुरू झाल्याने त्यांची आर्थिक घडी कुठेतरी बसत असताना अशाप्रकारे त्यांची अडवणूक केली जात असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

विद्यार्थी वाहक संस्था आक्रमक
पनवेल विद्यार्थी वाहक संस्था परवाने नूतनीकरण होत नसल्याने आक्रमक झाली आहे. अर्ज विनंती करूनही शाळांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्याचबरोबर परिवहन विभाग शाळाच्या संमती पत्राशिवाय परवाने नूतनीकरण करत नसल्याने परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. शिक्षक विभागाकडूनही शाळांना समज दिली जात नाही. त्यामुळे साहजिकच या प्रश्‍नावर आंदोलन करण्याचा इशारा पनवेल विद्यार्थी वाहक संस्थेने दिला आहे.

परिवहन विभागाने नियमावर बोट ठेवल्याने शाळांची संमती असणे आवश्यक आहे. मात्र, शाळा ही जबाबदारी झटकत आहेत. वास्तविक पाहता त्यांनी संमती पत्र देणे बंधनकारक आहे. परंतु त्यांच्याकडून आडमुठे धोरण अवलंबले जाते. त्यामुळेच कित्येक स्कूल व्हॅनच्या परवानांचे नूतनीकरण झाले नाहीत. तरीसुद्धा विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही ही सेवा सुरू ठेवली आहे. यासंदर्भात उपाययोजना करण्यासाठी आम्ही 6 डिसेंबरपर्यत मुदत दिली आहे. अन्यथा आरटीओ कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल.

पांडुरंग हुमणे
संस्थापक अध्यक्ष, पनवेल विद्यार्थी वाहक संस्था


Exit mobile version