। नेरळ । वार्ताहर ।
जिल्ह्यातील कर्जत खालापूर तालुका पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातो. पर्यटन वाढीस लागले पाहिजे यात कुठेही दुमत नाही, पण प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी व सामाजिक बांधिलकी आहे. कोणत्याही पर्यटनस्थळावर बंदी घालण्यापेक्षा तेथील भागातील रहिवासी, ग्रामस्थाना, गावप्रमुख व सरपंच यांना विश्वासात घेऊन तेथे काय उपाययोजना व खबरदारी घेता येईल यावर विचार विनिमय केला पाहिजे म्हणजे तेथील स्थानिक रोजगार विकसित होईल त्याला चालना मिळेल व पर्यटकांची ही सुरक्षा राखली जाईल.
पावसाळा पर्यटनात अशी घ्या काळजी
* किल्ल्यांवरील बुरुजांवर किंवा दरीच्या टोकावर उभे राहून फोटो अथवा सेल्फी काढणे टाळले पाहिजे.
* एखाद्या भागात आपण नदी नाले अथवा धबधबे, धरणामध्ये आपण फिरायला किंवा पर्यटनासाठी जाणार असाल तर आजूबाजूच्या परिसराची माहिती असणे गरजेचे आहे.
* नदी, धरण व धबधबे येथे पाण्याचा अंदाज पटकन येत नाही, तेव्हा शक्यतो पाण्यात जाणे टाळले पाहिजे.
* स्थानिक व गावकरी यांना सोबत ठेवणे, त्यांच्याशी योग्य संवाद साधला गेला पाहिजे.
* अनुभवी व प्रशिक्षित ट्रेकिंग ग्रुपसोबतच जायला हवे.
* आपण जात असलेल्या ठिकाणाची माहिती आपण जाण्यापूर्वी आपल्या कुटुंबाला देणे गरजेचे आहे.
* मद्यपान, ध्वनीप्रदूषण, प्लास्टिक कचरा यांसारख्या निसर्गला हानिकारक गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजेत.
* स्थानिक व इतर पर्यटकांना घृणास्पद वाटेल अशी कृते करणे टाळावे.
* जेथे जेथे धोकादायक व अपघात घडण्याची जास्त शक्यता आहे, तेथे माहिती फलक व आपत्कालीन संघटनांचे नंबर असणे जास्त गरजेचे आहे.
कर्जत तालुक्यामध्ये व इतर भागांमध्ये साहस आउटडोर व वेप फाउंडेशन या सामाजिक संस्था आपत्कालीन काळात किल्ल्यांवर, दर्या खोर्यामध्ये, डोंगरांमध्ये, नदी, नाल्यांमध्ये अडकलेल्या लोकांचे, पर्यटकांचे प्राण वाचवण्याचे काम करत आहे.
संतोष दगडे,
एव्हरेस्टवीर,
कर्जत