स्थानिक महिलांकडून कारवाईची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर दहिवली ग्रामपंचायतीमध्ये मालेगाव दहिवली येथे असलेल्या पुलाच्या आजूबाजूला पाण्यात उतरण्यास आणि पोहण्यास ग्रामपंचायत प्रशासनाने बंदी घातली आहे. स्थानिक महिलांनी त्याबद्दल आक्षेप घेतला होता. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून कारवाई करण्याची सूचना देणारे फलक नदी परिसर आणि गणेश घाट येथे लावले आहेत. उल्हास नदीवर दररोज शेकडोंच्या संख्येने लोक पाण्यात उतरुन मौजमजा करतात. अर्धनग्न आणि अश्लील चाळे यामुळे स्थानिक महिलांना मनस्ताप सहन करावा लागत होता. दरम्यान, महिलांकडून कारवाईच्या मागणीनंतर ग्रामपंचायतीकडून यापुढे तेथे पाण्यात उतरणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नेरळ जवळील दहिवली पुलाजवळ मागील दोन महिन्यांपासून दिवसभर पाण्यात उतरून पोहण्यासाठी येणारे हौशी तरुण यांची संख्या मोठी असते. नदीवर येणारे हे हौशी लोक दुपारचे दोन वाजले तरी अंघोळी करण्यासाठी उपस्थित असतात. त्यात मालेगाव आणि दहिवली गावातील स्थानिक महिला या नदीवरील गणेश घाट येथे धुणीभांडी करण्यासाठी येत असतात. मात्र, नदीवर अंघोळ करण्यासाठी येणाऱ्यांकडून सुरु असलेले अश्लील चाळे, त्याचवेळी अर्ध कपड्यात असलेले तरुण-तरुणी यामुळे स्थानिक महिलांना नदीवर येणे अवघड होऊन बसले आहे. त्यात तरुण-तरुणी यांच्याकडून नदी पात्रात सुरु असलेले चाळे यामुळे महिलांना मान खाली घालून कपडे धुवावे लागतात आणि तेथून काढता पाय घ्यावा लागतो. याबाबत महिलांनी ग्रामपंचायत कार्यलयात जाऊन सरपंच मेघा मिसाळ यांची भेट घेतली. सरपंचांनी सर्व सदस्यांच्या कानावर हा विषय घालून नदीत पोहण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, दहिवली व मालेगाव गावातील महिलांनी आक्रमक पवित्रा घेत दहिवली पुलाजवळ जाऊन तेथे अंघोळ करण्यासाठी आलेल्या नागरिकांना हाकलून लावले आहे. तसेच ग्रामपंचायतीकडून यासंदर्भात सूचना फलकदेखील लावण्यात आले आहे. त्या ठिकाणी सूचनेनंतरदेखील तरुण-तरुणी आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी दहिवली ग्रामपंचायत नेरळ पोलिसांना कळवणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
सध्या ज्या ठिकाणी तरुण-तरुणी अंघोळीला आल्यावर अर्धनग्न अवस्थेत अश्लील चाळे आणि हावभाव करतात. अगदी त्याच जागेवर संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची राज्यातील सर्वत उंच प्रतिमा उभी राहणार आहे. अशा प्रसन्न जागेवरील अश्लील चाळे बंद झालेच पाहिजेत.
अमर मिसाळ, माजी सभापती, कर्जत पंचायत समिती