महामार्ग वाहतूक पथकाचे वाहनचालकांना आवाहन
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66) वाकण फाटा आणि सुकेळी खिंड परिसरात सुमारे अर्धा किलोमीटरपर्यंत पाणी साचले असून, वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच रोहा-अलिबाग मार्गावरील भिसे खिंड येथे दरड कोसळल्याने या मार्गावरही अडथळे निर्माण झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर गोव्याकडे जाणाऱ्या तसेच गोव्यावरून मुंबईकडे येणाऱ्या वाहनचालकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन महामार्ग वाहतूक पथक, रायगड परिक्षेत्राने केले आहे. महामार्गावरील परिस्थिती लक्षात घेता नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
असे आहेत पर्यायी मार्ग :
मुंबईहून गोव्याकडे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे पुणे ताम्हिणी घाट निजामपूर नाका माणगाव राष्ट्रीय महामार्ग 66 मार्गे गोवा.
गोव्याहून मुंबईकडे : माणगाव निजामपूर नाका ताम्हिणी घाट पुणे मुंबईपुणे एक्स्प्रेस वे मुंबई.
