| पाली/बेणसे । वार्ताहर ।
जनावरांना लम्पी या विषाणूजन्य आजाराची लागण होत आहे. यासंदर्भात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. याचा परिणाम दूध व्यवसायावर तर झालाच आहे. आता याचा परिणाम चिकन व्यवसायावर सुद्धा झाला आहे. खबरदारी म्हणून अनेक जणांनी चिकन खाण्याकडे पाठ फिरवली आहे. परिणामी चिकन विक्रेत्यांचा धंदा मंदावला आहे. कोरोनानंतर आता कुठे व्यवसाय तग धरू लागला होता. लम्पि आजाराच्या विषयी सोशल मीडियावर पसरणारे गैरसमज याचा मोठा फटका चिकन व्यवसायिकांना बसला आहे.
लम्पीबद्दल लोकांमध्ये खूप चिंता व भय निर्माण झाले आहे. जनावरांप्रमाणेच कोंबड्या व इतर प्राण्यांना सुद्धा लम्पीची लागण होते. अशा प्रकारचे गैरसमज पसरले आहेत. परिणामी धोका नको व खबरदारी म्हणून बहुसंख्य लोकांनी चिकन तसेच मटण खाणे बंद केले आहे. कोरोनामुळे चिकन व मटण व्यावसायिक नुकसानीच्या गर्तेत गेले होते. आणि लम्पीमुळे पुन्हा एकदा या व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. त्यामुळे चिकन विक्रेते चिंतातुर झाले आहेत.
लम्पी रोग आल्याने चिकन व्यवसायावर परिणाम झाला आहे. चिकन मटणमधून सुद्धा हा रोग होतो असे वाटत असल्याने अनेकांनी चिकन खाणे सोडले आहे. परिणामी ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे.
हेमंत राऊत
चिकन विक्रेते, पाली
लम्पी पशुधनाच्या विषाणू जन्य संसर्गीय आजार फक्त गुरांना होतो, गोवंशीयांना होणारा हा आजार इतर कोणत्याही पशु पक्षी प्राण्यांना होत नाही, सोशल मिडियावर व्हायरल होणार्या व गैरसमज पसरवणार्या पोस्टवर विश्वास ठेवू नये. सदृढ आरोग्यासाठी अंडी, दूध व मांसाहारी पदार्थ खाणे गरजेचे आहे. हा आजार कोंबड्यांना होत नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये.
डॉ सविता राठोड,
पशुधन अधिकारी पाली सुधागड
लम्पी हा फक्त गाई, वासरे व बैल यांना होणारा आजार आहे. हा कोंबड्यांना किंवा माणसांना होणारा आजार नाही आहे. त्यामुळे लोकांनी घाबरून न जाता व अफवांवर विश्वास न ठेवता चिकन व दुध बिनधास्त खा व तंदुरुस्त राहा.
डॉ. प्रशांत कोकरे,
पशुधन विकास अधिकारी, जांभुळपाडा