शववाहिनी उद्घाटनाच्या प्रतिक्षेत

काम पूर्ण होऊनसुद्धा लोकार्पण नाही


| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड शहरातील समशानभूमीत सुमारे एक कोटी रुपये खर्च करून शववाहिनीचे काम पूर्ण करण्यात आले. गॅसवर चालणाऱ्या शववाहिनीमुळे लाकडाचा वापर होणार नसल्याने धुराचे प्रदूषण टाळले जाणार आहे. स्थानिक आमदारांनी यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. मुरुड समशानभूमीत या शवगृहाचे काम ततप्तरतेने पूर्ण करण्यात आले आहे.परंतु, गॅसवर आधारित ही शववाहिनी असल्याने गॅसचा पुरवठा होणे क्रमप्राप्त असताना तो न झाल्याने लोकार्पण सोहळा रखडला असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

शववाहिनीचे संपूर्ण काम पूर्ण हे जानेवारी महिन्यातच झाले आहे. परंतु, गॅसवर ही शववाहिनी असल्याने किमान 20 गॅस सिलिंडर आवश्यक असल्याची माहिती मिळत आहे. गॅस सिलिंडर क्रेडिटवर मिळत नसल्याने सदरील लोकार्पण सोहळा रखडल्याची बाब समोर येत आहे. शवगृहाचे काम पूर्ण असूनसुद्धा याचा लोकांना कोणताच फायदा घेता आलेला नाही. मुरुड नगरपरिषदेस गॅस सिलिंडर क्रेडिटवर देण्याससुद्धा गॅस एजन्सीने नकार दिला असल्याने गॅस सिलिंडर रोखीत घेतल्याशिवाय मुरुड नगरपरिषदेकडे पर्यायच नाही आहे. शव जाळण्यासाठी गॅस खूप आवश्यक आहे. परंतु, रोखीने गॅस खरेदी करण्यासाठी नगरपरिषद स्वारस्य न दाखवत असल्याने काम पूर्ण होऊसुद्धा लोकार्पण सोहळा रखडल्याचे समोर येत आहे.

याबाबत आमच्या प्रतिनिधीने सुपारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन बाबा दांडेकर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, नगरपरिषदेकडून गॅस सिलिंडर क्रेडिटवर देण्याची विचारणा झाली होती. परंतु, सिलिंडरचे व्यवहार हे रोखीत होत असतात. कंपनीला वेळेत पैसे पोहोचले नाही तर 18 टक्के व्याजदर आकारते, त्यामुळे गॅसचा व्यवहार हा रोखीत होत असतो. क्रेडिटवर देण्यास नकार दिल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी सदरील लोकार्पण सोहळा लवकरच संपन्न होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Exit mobile version