नवरात्रोत्सवात सामजिक, शैक्षणिक उपक्रमांचा जागर

। सुधागड-पाली । वार्ताहर ।
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उत्सव साजरे करण्यावर काही निर्बंध आले आहेत. या परिस्थितीत सुधागड तालुक्यात असंख्य विधायक उपक्रम राबवून नवरात्रोत्सव साजरा करण्यात आला. कुठे अंधश्रद्धा निर्मूलनाचा जागर, तर कुठे स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र, कुठे ग्रंथालय निर्मिती, तर कुठे नवदुर्गांचा सन्मान, कुठे आरोग्य शिबीर भरविले गेले. या सर्व विधायक उपक्रमास सर्व नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. याद्वारे सण व उत्सवाचे स्वरूप बदलतांना दिसत आहे.
सुधागड तालुक्यातील वावे गाव, पालीतील श्री स्वामी समर्थ नगर व परळी येथील जय दुर्गा माता मित्र मंडळ नवरात्रोत्सवात अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा पालीच्या वतीने चमत्काराचे प्रयोग सादरीकरण व वैज्ञानिक जाणिव जागृती करण्यात आली.
अंनिस पाली शाखेचे कार्याध्यक्ष अमित निंबाळकर व पदाधिकार्‍यांनी यावेळी अनेक भोंदू बुवा – बाबा समाजामध्ये आपले प्रस्थ कसे वाढवतात आणि लोकांचे कसे शोषण करतात हे सप्रयोग दाखविले. जिभेतून तार आरपार टाकणे, पाण्यावर दिवा पेटवणे, हवेतून सोन्याची चैन व अंगारा काढणे, पेटता कापूर खाणे, जळता पलीता हातावरुन फिरविणे, दोरी कापूण पुन्हा जोडणे, लिंबातून लाल दोरा टाकून काळा करणे, नारळातून करणी काढणे, रिकाम्या गडूमधून तीर्थ काढणे आदी प्रयोगांचे सादरीकरण केले. तसेच बुवा-बाबा, तांत्रिक-मांत्रिक व भगत लोकांना अशा भ्रामक गोष्टी दाखवून त्यांच्या अज्ञानाचा व अगतिकतेचा फायदा घेतात. परिणामी सुशिक्षित लोक देखिल यांच्या दिखाव्याला बळी पडतात. त्यामुळे अशा कोणत्याच गोष्टीवर विश्‍वास न ठेवता केवळ वैज्ञानिक दृष्टीकोनाचा व संविधानिक मार्गांचा अवलंब करावा असे आवाहन केले व उपस्थिती त्यांच्या अंधश्रद्धांचे निर्मूलन केले.

नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून तालुक्यात अनेक विधायक उपक्रम राबविण्यात आले. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्र आणि ग्रंथालय सुरू झाले. सण व उत्सवाच्या माध्यमातून अशा स्वरूपाचे विधायक बदल घडून येणे ही बाब आदर्शवत आहे.
प्रा. संतोष भोईर, सुधागड तालुका स्पर्धा परिक्षा प्रमुख

नवरात्रोत्सवात ठिकठिकाणी अंधश्रद्धा निर्मूलनाचे व चमत्कार सादरीकरणाचे अनेक प्रयोग केले. लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. विविध सणांच्या माध्यमातून अशा प्रकारे प्रबोधन व जाणीवजागृतीसाठी लोक स्वतःहुन पुढे येत आहेत ही गोष्ट स्वागतार्ह आहे.
अमित निंबाळकर, कार्याध्यक्ष, महा. अंनिस, शाखा, पाली-सुधागड

Exit mobile version