प्रिझमच्या कलाकारांनी केली पथनाट्यातून जनजागृती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग अंतर्गत समाज कल्याण विभाग, रायगड- अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक समता सप्ताहा निमित्त जागर सामाजिक न्यायाचा या पथनाट्यातून प्रिझम संस्थेच्या कलाकारांनी सुनील जाधव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, रायगड- अलिबाग यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची अलिबाग बस स्थानक येथे जनजागृती केली.
या प्रसंगी सुनील जाधव सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग रायगड अलिबाग, कदम गृहपाल शासकीय मुलांचे वसतिगृह समाज कल्याण विभाग रायगड अलिबाग, राजाराम मोरे गृहपाल, पोळ समाज कल्याण विभाग, अनुजा पाटील समतादूत, बार्टी रश्मी भोईर समतादूत, बार्टी यांसह अन्य मान्यवर, शासकीय कर्मचारी व बहुसंख्य प्रवासी उपस्थित होते.
प्रिझम संस्था गेली अनेक वर्ष पथनाट्यातून जनसामान्यांना प्रबोधन करण्याचे काम करीत असून सामाजिक समता कार्यक्रमानिमित्त अलिबाग बस स्थानक, पोयनाड, वडखळ बस स्थानक, पेण येथे जागर सामाजिक न्यायाच्या पथनाट्याच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाधान घटकांकरिता असणार्या शासकीय योजनांचे प्रबोधन प्रिझमच्या कलाकारांनी केले आहे. संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी, भारत सरकार तपस्वी नंदकुमार गोंधळी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या पथनाट्यामध्ये प्रतीक कोळी, सुचित जावरे, अमृता शेडगे, प्रसाद अमृते, सागर पाटील, स्वप्नाली घुगे, निदिशा वैद्य, प्रगती कासार पार्थ म्हात्रे, वैष्णवी नागे हे कलाकार सहभागी झाले होते. यावेळी प्रिझम संस्थेच्या सर्व टीमचा पुष्पगुच्छ देऊन समाज कल्याण विभागाच्या वतीने सन्मान करण्यात आला.