दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्काराने होणार गौरव
| अलिबाग | वार्ताहर |
लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते राजन पांचाळ यांना आंतरराष्ट्रीय एक्सलन्स अवॉर्ड जाहीर करण्यात आला आहे. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. हा सोहळा दि.7 जानेवारी 2024 रोजी पनवेल येथे क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. यावेळी राजन पांचाळ यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात पत्रकारिता तसेच सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, वैद्यकीय, सांस्कृतिक कला अशा विविध क्षेत्रात अविरतपणे उल्लेखनीय कार्य करणारे आणि सर्व समाजाला प्रेरणादायी असलेल्या व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगल प्रभात लोढा, खा. श्रीरंग बारणे, शेकाप नेते जे.एम. म्हात्रे, संपादक विवेक मेहत्रे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
राजन पांचाळ हे सांस्कृतिक आणि नाट्य क्षेत्रात भरीव योगदान देत आहेत. ग्रामीण रंगभूमीची चळवळ सदैव कार्यरत राहण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यांना जाहीर झालेल्या पुरस्काराने माजी आमदार पंडित पाटील, रा जि.प. माजी सदस्य ॲड. आस्वाद पाटील, भावना पाटील, झेप फाऊंडेशनच्या अध्यक्षा चित्रा पाटील, पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष तथा शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, आदर्श पतसंस्थेचे संचालक सतीश प्रधान, अनंत म्हात्रे, पत्रकार प्रकाश म्हात्रे, अनंत सांस्कृतिक कलामंच पेझारी-अलिबाग संस्थेचे कलाकार, लक्ष्मीनगर मंडळाचे पदाधिकारी, नूतन क्रीडा मंडळाच्या पदाधिकारीआदींनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.