| उरण | वार्ताहर |
टी.एम.जी क्रिएशन आणि एनोवेटिव्ह मानबिंदू प्रकाशन यांच्या संयुंक्त विद्यमाने ललकारी सन्मानाची अनुभूती महागौरव संमेलनाचे आयोजन रविवारी (दि. 29) मुंबई मराठी पत्रकार संघ, मुंबई येथे करण्यात आले होते. यावेळी राज्यभरातील समाजसेवी संस्था तसेच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. स्मृतीचषक, सन्मानपत्र, पदक (मेडल) असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी रायगड जिल्ह्यातील उरण सामाजिक संस्थेच्या कार्याचा गौरव करत पुरस्कार प्रदान करण्यात आला.
उरण सामाजिक संस्थेकडून संतोष पवार, काशिनाथ गायकवाड, प्रा. राजेंद्र मढवी, रुपेश पाटील, वैभव पाटील यांनी कर्नल रवीद्र त्रिपाठी, ज्येष्ठ अभिनेत्री नयना आपटे, अभिनेता अभंष कुमार यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारला.
यावेळी उरण सामाजिक संस्थेचे सरचिटणीस संतोष पवार यांनी संस्थेचे अध्यक्ष शेतकरी नेते सुधाकर पाटील यांच्या कार्याचा गौरव करत हा सन्मान संस्थेच्या कार्यकर्त्यांचा असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी संस्थेच्या वतीने पुरस्कार घेण्यासाठी आलेल्या प्रा. राजेंद्र मढवी, काशिनाथ गायकवाड, रुपेश पाटील, वैभव पाटील आदींच्या कामाची माहिती संतोष पवार यांनी या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थितांना करून दिली.







