पेणच्या गणेशमूर्तीला ‘जीआय’ प्रमाणपत्र प्रदान

। अलिबाग । प्रतिनिधी ।

जगप्रसिद्ध असलेल्या पेणच्या गणेशमूर्तींना भौगोलिक मानांकन प्राप्त झाला असून, त्याचे प्रमाणपत्र जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते मूर्तीकारांना देण्यात आले. जीआय मानांकनामुळे पेणमधील गणेशमूर्तींची आणखीवेगळी ओळख निर्माण झाल्याने पेणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.

पेणमध्ये सुमारे एक हजारांहून कारखाने आहेत. पेण शहराबरोबरच ग्रामीण भागातदेखील मूर्ती तयार केल्या जातात. पेणच्या गणेशमूर्ती आकर्षक, रेखीव असल्याने रायगडसह पुणे, मुंबई तसेच देशविदेशातदेखील त्यांना प्रचंड मागणी आहे. या व्यवसायातून हजारो लोकांना रोजगार मिळत आहे. पेणमधील गणेशमूर्तींना जीआय मानांकन मिळावे यासाठी मूर्तीकारांकडून शासनाकडे मागणी करण्यात आली होती. चेन्नई येथील जीआय नोंदणी कार्यालयाला प्रस्ताव सादर केला होता. गणेशमूर्तींना मानांकन मिळाले होते. मात्र, प्रमाणपत्राची प्रतीक्षा लागून राहिली होती. अखेर ही उत्कंठा संपली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते जीआय मानांकनाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. या मानांकनामुळे पेणमधील गणरायाच्या मूर्तीची आणखी एक वेगळी ओळख निर्माण राहणार आहे. मानांकनामुळे फसवणूक थांबण्यास मदत होणार आहे.

पेणमधील गणेशमूर्तीला जीआय मानांकन प्रमाणपत्र मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. पेणमधील मूर्तीची एक वेगळी ओळख यातून निर्माण झाली आहे. मूर्तीची नक्कल करणार्‍यांना यातून लगाम बसणार आहे.

श्रीकांत देवधर, अध्यक्ष,
श्रीगणेश मूर्तीकार व व्यवसायकार गणेश कल्याणकारी मंडळ

Exit mobile version