फुंडे ग्रामपंचायतीला आय.एस.ओ.नामांकन प्रदान

। उरण । वार्ताहर ।

उरण तालुक्यातील फुंडे ग्रामपंचायतीला आय.ए.एस. कमिटी कडून एस.आरसर्टीफिकेट संस्थेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे आय.एस.ओ. 9001: 2015 हे नामांकन सर्टिफिकेट संस्थेचे लिड ऑडिटर किरण भगत व गटविकास अधिकारी समिर वाठारकर यांच्या हस्ते गटविकास अधिकारी, पंचायत समिती उरण यांच्या दालनात प्रदान करण्यात आले. या नामांकन सर्टिफिकेटचे मानकरी ठरलेल्या फुंडे ग्रामपंचायतीचे तालुक्यातून सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

या नामांकन प्राप्तीसाठी ग्रामपंचायत कार्यालयाची कामकाज पद्धत, स्वच्छता, नागरिकांना मिळणारी वागणूक,ग्रामस्थांना पुरविण्यात येणार्‍या सुविधा, निटनेटकी इमारत, आदी निकषानुसार हे नामांकन देण्यात येते. त्यामुळे फुंडे ग्रामपंचायतीने वरील निकष पाळण्यासाठी अधिक मेहेनत घेतल्याने हे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नामांकानाची मानकरी ठरली आहे. उरण तालुक्यात एकूण 35 ग्रामपंचायती असून फुंडे ग्रामपंचायतीने हे यश संपादन केले आहे. तर उरण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विनोद मिंडे व लिड ऑडिटर किरण भगत यांचे विशेष मार्गदर्शन कामी आले असल्याचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सातंगे यांनी नमूद केले. हे नामांकन स्विकारतांना उरण पंचायत समिती येथे फुंडे ग्रामपंचायतीचे सरपंच सागर घरत, उपसरपंच चंद्रकांत म्हात्रे, वरिष्ठ सहाय्यक युवराज पाटील, ग्रामपंचायत सदस्या रुचिता म्हात्रे , कविता म्हात्रे, जुईली घरत, हर्षा घरत, ग्रामस्थ प्रितम म्हात्रे, ग्रामपंचायत कर्मचारी अरुणा म्हात्रे, दिपाली कडू, विलास भोईर आदी उपस्थित होते.

Exit mobile version