अनंत देवघरकर यांना शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान

। कुसुंबळे । वार्ताहर ।
साहित्यसंपदा समुहातर्फे निवृत्त शिक्षक अनंत देवघरकर यांना त्यांनी केलेल्या कार्याची नोंद घेत नुकतेच रिलायन्स कंपनीचे जनसंपर्क अधिकारी, रमेश धनावडे यांच्या हस्ते शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अनंत देवघरकर यांनी महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय हाशिवरे येथे, शिक्षक, पर्यवेक्षक व नंतर मुख्याध्यापक म्हणून काम पाहिले. मराठी, इंग्रजी, संस्कृत, आणि गणित या विषयांचे ते शिक्षक होते. पण प्रामुख्याने मराठी व इंग्रजी विषय ते शिकवित. चारही विषयांवर त्याचे प्रभूत्व होते. वयाच्या पाच सहा वर्षापासून ते कविता करतात व त्यांचा दुर्वा नावाचा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला आहे. निवृत्तीनंतरही ते गप्प बसले नाहीत तर ते जेष्ठ नागरिक संस्थेचे कार्यरत सदस्य आहेत. नवनवीन कविंना प्रोत्साहन मिळावे म्हणून त्यांनी ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या भवनात कवी संमेलने भरवली. आजही त्यांना महात्मा गांधी विद्यालयात आदराने बोलावले जाते. प्रेमळ स्वभाव आणि सदा हसतमुख राहणे व दुसर्‍याला सुखी पाहणे यातच त्यांना समाधान मिळते. वयाच्या 82 व्या वर्षात पदार्पण केले असले तरी त्यांची कार्य करण्याची तळमळ निश्‍चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या याच कार्याची नोंद घेत तसेच निवृत्ती नंतरही उत्कृष्ठ समाजनिर्मितीसाठी ज्ञानार्जनाचे आदर्शवत कार्य करण्याच्या व शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाची आणि केलेल्या कार्याबद्दल त्यांना शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी साहित्यसंपदा समूहाचे संस्थापक वैभव धनावडे, रवींद्र सोनावणे, कवी दिलीप मोकल, सामाजिक कार्यकर्त्या जिविता पाटील तसेच प्रतिभा नंत देवघरकर, वैभवी देवघरकर उपस्थित होत्या.

Exit mobile version