विशाल लाड सर्वोत्तम खेळाडू
| मुंबई | प्रतिनिधी |
शिवमुद्रा प्रतिष्ठानने यंग भारत सेवा मंडळाने आयोजित केलेल्या कुमार गट जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे जेतेपद पटकावले. शिवमुद्राचा विशाल लाड स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला. त्याला रोख रू. तीन हजार आणि सायकल देऊन गौरविण्यात आले. प्रभादेवी येथील राजाभाऊ साळवी मनोरंजन मैदानातील राष्ट्रीय कबड्डी खेळाडू स्व. गोपीनाथ जाधव क्रीडांगणावर झालेल्या अंतिम सामन्यात शिवमुद्राने सिद्धीप्रभाचा प्रतिकार 40-23 असा सहज मोडून काढत रोख रू. सात हजार आणि स्व. सतीशचंद्र फणसेकर चषक आपल्या नावे केला. उपविजेत्या सिद्धीप्रभाला रोख रू. पाच हजार व स्व. वंदना रघुनाथ नाईक चषकावर समाधान मानावे लागले.
या अगोदर झालेल्या उपांत्य सामन्यात शिवमुद्राने एस.एस.जी. फाऊंडेशनचा (45-40) असा तर सिद्धीप्रभाने विजय क्लबचा (34-31) असा पराभव करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. उपांत्य पराभूत दोन्ही संघांना प्रत्येकी रोख रू. तीन हजार आणि कुमारी महेश्वरी उमेश गावडे चषक प्रदान करण्यात आला. श्रीराम मंडळ विश्वस्तचा दिवेश गवळी स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईचा, तर सिद्धीप्रभाचा सिद्धेश भोसले स्पर्धेतील उत्कृष्ट पकडिचा खेळाडू ठरला. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख रू. एक हजार व मिक्सर देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी नेत्रविशारद तात्याराव लहाने, अर्जुन पुरस्कार खेळाडू माया मेहेर, कस्टल डेव्हलपमेंटचे राजेश बागवे, तारक राऊळ, सीताराम साळुंके (दोन्ही शिव छत्रपती पुरस्कार खेळाडू), राष्ट्रीय कबड्डी खेळाडू विनायक लाड व चंद्रकांत भारती, सारंग, संघाचे कार्याध्यक्ष अजित राणे आदी मान्यवर उपस्थित होते.