15 जुलैला होणार वितरण
| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.च्यावतीने 15 जुलै हा कबड्डी महर्षी स्व. शंकरराव(बुवा) साळवी यांचा जन्मदिन कबड्डी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त किशोर, कुमार व खुला गट राष्ट्रीय स्पर्धेत विशेष प्राविण्य दाखविणाऱ्या खेळाडूंना रोख रकमेची शिष्यवृत्ती देण्यात येते. तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते, पंच, खेळाडू, संघटक, तसेच खेळाच्या प्रसिद्धीसाठी मेहनत घेणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार यांचा शाल, श्रीफळ,अमृत कलश देऊन सन्मान करण्यात येतो. या सर्व पुरस्कारांचे वितरण शनिवारी (15 जुलै) ठाणे येथे करण्यात येणार आहे.
यंदापासून स्व.फिदा कुरेशी यांच्या नावाने सुरू करण्यात आलेला ज्येष्ठ प्रशिक्षक पुरस्कार शरद चव्हाण- पुणे,अनिल घाटे- मुंबई शहर, सुरेश मापुसकर- ठाणे, राजेंद्र महाजन- मुंबई शहर, यांना जाहीर. परभणीच्या कबड्डी करीता अतुलनीय योगदान देणारे मंगल पांडे यांना कृतज्ञता पुरस्कार, तर सुभाष हरचेकर पुण्यनगरी – मुंबई, राजेंद्र काळोखे लोकमत – पुणे, सूरज कदम तेजोन्नती परभणी, इक्बाल जमादार रत्नागिरी टाइम्स यांना ज्येष्ठ क्रीडा – पत्रकार पुरस्कार. पुण्यात महिलेचे प्राण वाचविणाऱ्या लेशपाल जवळगेला धर्याशील पुरस्काराने विशेष सन्मान. नाशिकचा आकाश शिंदेला स्व. मधुसूदन पाटील, तर मुंबई उपनगरच्या हरजितसिंग कौर संधूला स्व. अरुणा साटम पुरस्कार. अहमदनगरचा आदित्य शिंदे व पुण्याची सलोनी गजमल यांना स्व. मल्हारराव बावचकर पुरस्कार.
नयन सडविलकर – रत्नागिरी, पांडुरंग धावडे – पुणे, मदन चौधरी – ठाणे, बबन होळकर – मुंबई उपनगर यांना ज्येष्ठ कार्यकर्ता, तर चैताराम पवार – जळगाव, वसंत मांजरेकर – ठाणे, प्रकाश रेडेकर – मुंबई शहर, विलास शिंदे – मुंबई उपनगर, शंकर बुढे – लातूर, रोहिणी अरगडे – पुणे, शहाजान शेख – कोल्हापूर यांना ज्येष्ठ पंचाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. यंदाचा स्व. रमेश देवाडीकर स्मृती श्रमयोगी कार्यकर्ता पुरस्कार रतन पाटील – ठाणे, धर्मा सावंत – रत्नागिरी यांना, तर ज्येष्ठ खेळाडू म्हणून किरण भोसेकर – पुणे, रघुनंदन भट – नाशिक, लीला पाटील-कोरगावकर – मुंबई शहर, वनिता पाटील-तांडेल – ठाणे, निलिमा साने-दाते – पुणे यांना जाहीर करण्यात आला. राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन – नांदेड(पुरुष), तर शिवशक्ती महिला संघ – मुंबई शहर यांना देखील गौरविण्यात येणार आहे. राज्य पंच परीक्षेत प्रथम आलेल्या रत्नागिरीच्या स्वप्नील बैकर याला स्व. वसंतराव कोलगावकर सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत गुणानुक्रमे प्रथम ठरलेल्या मुंबई उपनगर कबड्डी असो.चा देखील यावेळी सन्मान होणार आहे.
उत्कृष्ट स्पर्धा आयोजक म्हणून अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटना व मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठान-परभणी यांना देखील गौरविण्यात येणार आहे. ठाणे जिल्हा कबड्डी असो.च्या यजमान पदाखाली ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे सायंकाळी 4-30 वा. हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. मुख्य एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व राज्य संघटनेचे अध्यक्ष अजित पवार व केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीने सोहळ्याची रंगत वाढणार आहे. तरी क्रीडाप्रेमींनी या गुणगौरव सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहावून पुरस्कार विजेत्यांना प्रोत्साहित करावे असे आव्हान या पत्रकाद्वारे महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. सचिव बाबुराव चांदेरे व यजमान ठाणे जिल्हा कबड्डी असो.चे अध्यक्ष कृष्णा पाटील यांनी प्रसार माध्यम मार्फत केले आहे. या कार्यक्रमात कोणतीही कसर राहू नये म्हणून कृष्णा पाटील जातीने लक्ष ठेऊन आहेत.