रायगडात जागरूक पालक, सुदृढ बालक मोहीम

साडे चार लाख बालकांची होणार तपासणी
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या समन्वयाने जागरूक पालक सुदृढ बालक मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेत 18 वर्षांपर्यंतच्या सुमारे 4 लाख 61 हजार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील सदर मोहीम राबविण्यात येत आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये विविध आजारामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत असतो. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह बालकांच्या आरोग्या विषयी जागरूकता निर्माण करणेसाठी जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या समन्वयाने जागरूक पालक सुध्रुढ बालक मोहिम हाती घेण्यात आली आहे. – डॉ.किरण पाटील,सीईओ,जि.प.

257 पथके तैनात
सदरील मोहीम पुढील दोन महिने राबविली जाईल. मोहीम यशस्वी करण्यासाठी 257 आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत. पथकांमध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातीला 30 वैद्यकीय अधिकारी, 161 समुदाय आरोग्य अधिकारी, 66 प्राथमिक आरोग्य केंद्रातील व ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रातील अंगणवाडी आणी शाळांना भेट देऊन आरोग्य तपासणी करतील.

जिल्ह्यातील एकूण 2 हजार 528 शासकीय, 385 निमशासकीय आणी 246 खासगी शाळांमधील 3 लाख 21 हजार बालकांची तपासणी केली जाणार आहे. तसेच 3 हजार 59 अंगणवाड्या आणी 72 खासगी नर्सरी मधील 1 लाख 40 हजार बालकांची तापसणी होईल. आशा प्रकारे पुढील दोन महिन्यात जिल्यातील 4 लाख 61 हजार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग, शिक्षण विभाग आणी महिला व बालकल्याण विभागानां मोहीम कालावधी मध्ये जास्तीत जास्त बालक, विद्यार्थी अंगणवाडी शाळेत हजर राहतील याची दक्षता घ्यावी असे निर्देश दिले आहेत. सदर मोहिमेमध्ये बालकांमधील जन्मजात व्यंग, रक्तक्षय, दाताचे विकार, डोळ्याचे विकार, तिरळेपणा, दुभंगलेले ओठ, हाडाचे व्यंग, जीवनसत्व कमतरता, इत्यादी आजाराचे निदान आणी उपचार केले जाणार आहेत. आवश्यकतेनुसार मोफत शास्त्रक्रिया ही करण्यात येणार आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनी मोहीम कालावधी मध्ये जास्तीत जास्त बालकांची आरोग्य तपासणी करून घ्यावे, असे आवाहन पालकांना केले आहे.

Exit mobile version