नाटकातून कृषीविषयक जागरूकता

रत्नागिरीमधील भाटघर येथे कृषी कन्यांकडून स्तुत्य उपक्रम

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत ग्रामीण जागृती कार्यानुभव कार्यक्रमातील कृषि कन्या गटाने महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त भाटघर येथे विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन केले. त्यामध्ये नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांना अभिवादन करत कृषीविषयक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कृषी कन्यांकडून राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतूक करण्यात येत आहे.

कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले कृषीकन्या गटाने सादर केलेले एकांकिकेचे सादरीकरण. या नाटकातून तरुण पिढीचे शेतीपासून वाढते दुरावलेपण , बनावट बियाणे, कीटकनाशके व खतांमुळे शेतकऱ्यांची होणारी फसवणूक यावर नाटकाद्वारे प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेती सोडू नका व जमीन विकू नये स्वतःच्या जमिनीशी नाळ जोडून ठेवा, असा प्रभावी संदेश नाटकातून देण्यात आला. या उपक्रमातून कृषी दिन साजरा करण्याबरोबरच गावकऱ्यांमध्ये शेतीविषयी जागरूकता निर्माण होऊन कृषी संस्कृती जपण्याचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला.

सुतारवाडी जिल्हा परिषद शाळेतून पारंपरिक दिंडीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. झाडे लावा व पर्यावरण संवर्धनाचे संदेश देणारे फलक हातात घेऊन विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी अंगणवाडीत लहान मुलांशी संवाद साधून शेती व वृक्षांचे महत्त्व पटवून देण्यात आले. सुरंगी रोपाचे वृक्षारोपण करून हरितमुळे, हरित भविष्य हा संदेश देण्यात आला. सायंकाळी भाटघर गावात जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास मुगिज-भाटघर ग्रामपंचायतीच्या सरपंच वनिता तांबे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी महाविद्यालय, दापोलीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर कार्यक्रम समन्वयक डॉ. अशोक चव्हाण, रावे केंद्र प्रमुख डॉ. विजय देसाई, विषय विशेषज्ञ डॉ.रणजीत महाडिक, कार्यक्रम अधिकारी डॉ. आशिष शिगवण आणि डॉ. प्रवीण झगडे उपस्थित होते.

Exit mobile version