साकव संस्थेची मोहिम
। पेण । वार्ताहर ।
आदिवासी समाजाचे लसीकरणाबाबत जे गैरसमज झाले आहेत ते दूर करून त्यांना लसीकरणास प्रवृत्त करणे व विषाणूमुळे होणारे दुष्परिणाम व त्यावरील उपाय व घ्यावयाची काळजी याबाबत माहिती देणे तसेच आदिवासींमध्ये जनजागृतीच्या माध्यमातून त्यांच्या शंका कुशंका दूर करण्याच्या दृष्टीने दर्या खोर्यात वसलेल्या पाबळ खोर्यांतील आदिवासी गाव वाड्यांमध्ये साकव संस्थेच्या वतीने तिसरी जनजागृती मोहीम घेण्यात आली.
जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगड जिल्ह्यातील संस्था संघटनाने रायगड कोव्हिड जनजागृती गट निर्माण केला असून साकव संस्था ही त्यातील एक घटक आहे. त्यानुसार संस्थेने कोव्हिडबाबत घेतलेल्या जबाबदारीप्रमाणे जनजागृती करण्याची मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम खारघर नवी मुंबई येथील डॉ.जी.डी.पोळ फाउंडेशन, येरला मेडिकल ट्रस्ट आयुर्वेदिक कॉलेज व हॉस्पिटलचे विश्वस्त ॠषिकेश पोळ व रूग्णालयाचे डीन डॉ.संजीव यादव यांच्या प्रेरणेने व आरोग्य भरती मुंबई व साकव संस्थेच्या संयुक्तीक विद्यमाने घेण्यात आली. यावेळी कोलेटी, वरप, पाबळ, जीर्णे या 4 ग्रामपंचायतीमधील कोलेटी, चिंचवाडी, पाहिरमाळ, बोरीचामाळ, वरप, जांबोशी, कोंढवी, वरडावाडी, पाबळ वाडी, कळद वाडी, जीर्णे क्षेत्रातील गाव वाड्यांमध्ये राबविण्यात आली.
या मोहिमेत डॉ.विनोद साठे, डॉ.मंदार कर्वे, डॉ.संदीप राजपूत, डॉ.विराज केळकर, डॉ.प्रेमानंद भालेराव हे सामील झाले होते. यांना साकव संस्थेतर्फे संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.सुरेंद्र धुमाळ, सचिव अरूण शिवकर, माणिकराज गावंड, प्रभाकर ठाकूर, उमेश दोरे, मंजुळा पाटील, पांडुरंग तुरे, गजानन भोईर, अनंत सत्वे, आशा वर्कर मीनाक्षी कदम यांनी सहकार्य केले.