गरीब वस्तीत मासिक पाळीबाबत ‘जागृती’

कळंबोलीमध्ये सॅनिटरी नॅपकिनचे वाटप
जागृती सनी पाटील यांचा पुढाकार

। पनवेल । वार्ताहर ।
जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिवस दरवर्षी 28 मे रोजी साजरा केला जातो. मासिक पाळीच्या काळात महिलांना स्वच्छतेचे महत्त्व कळावे, हा यामागचा उद्देश आहे. खेड्यापाड्यात आणि शहरांमध्ये गरीब वस्तीत राहणार्‍या लाखो स्त्रिया आजही यासंबंधीच्या महत्त्वाच्या माहितीपासून अनभिज्ञ आहेत. या पार्श्‍वभूमीवर जागृती सनी पाटील यांनी पुढाकार घेऊन कळंबोली येथील झोपडपट्टीमध्ये जाऊन येथील महिलांना मासिक पाळी आणि स्वच्छतेबाबत शास्त्रशुद्ध वैद्यकीय पद्धतीने माहिती दिली. वेगवेगळ्या आजारांपासून दूर राहण्यासाठी स्वच्छता किती महत्त्वाची आहे, हे त्यांनी यावेळी पटवून दिले. त्याचबरोबर संबंधित भगिनींना सॅनिटरी नॅपकिन वाटप करण्यात आले. त्यामुळे शारीरिक स्वच्छता आरोग्य कसे अबाधित याचे महत्त्वसुद्धा त्यांनी सांगितले.

मासिक पाळीच्या वेळी महिलांचा थोडासा निष्काळजीपणा त्यांना हेपेटायटीस बी, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, तसेच वेगवेगळे संसर्ग यांसारख्या गंभीर आजारांकडे ढकलू शकते, हेही त्यांना माहीत नाही. त्याचा परिणाम महिलांवर केवळ शारीरिकच नाही, तर मानसिकदृष्ट्याही दीर्घायुष्यावर होऊ शकतो. विशेष करून गरीब लोकवस्तीमध्ये राहणार्‍या अत्यल्प उत्पादन गटातील महिलांना याबाबत माहिती नसते. या गोष्टीचा विचार करून जागृती पाटील पुढाकार घेऊन कळंबोली वसाहतीतील सिंग सिटी हॉस्पिटलसमोरील झोपडपट्टी तसेच पावसाळी नाल्याच्या बाजूला असलेला गणेश नगरमध्ये शनिवारी सकाळी जाऊन संबंधित महिलांना मासिक पाळीबाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले. या उपक्रमाला येथील स्त्रियांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आणि, मासिक पाळीच्या वेळी आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपण्याचा जणू काही संकल्पच केला. यावेळी रसिका पाटील, ज्योती सोलंकी, रेखा मांजरेकर, शिल्पा झाकडे, मेघा पाटील, रेणू पडवळ उपस्थित होत्या.

प्रत्येक महिन्याला सॅनिटरी नॅपकिन देणार
कळंबोली येथील ज्या झोपडपट्ट्या आहेत. तेथील महिला अत्यंत गरीब आहेत. कचरा वेचून ते आपला उदरनिर्वाह करतात. दोन वेळचं त्यांना कसेबसे अन्न मिळते. त्यामुळे सॅनिटरी नॅपकिन वापरणे त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. या वस्तुस्थितीचा विचार करून प्रत्येक महिन्याला या झोपडपट्टीमधील भगिनींना सॅनिटरी नॅपकिन आम्ही देणार असल्याचे जागृती पाटील यांनी सांगितले.

जागतिक मासिक पाळी दिनाच्या निमित्ताने गरीब वस्तीमध्ये मासिक पाळी व वैयक्तिक स्वच्छतेबाबत जनजागृती आणि प्रबोधन करण्यात आले. जागृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला. पुढेही महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अशाच प्रकारचे कार्यक्रम घेण्यात येतील.

– अ‍ॅड. रसिका पाटील
Exit mobile version