वनविभाग ॲक्शन मोडमध्ये; ग्रामस्थांना सतर्क राहण्याचे आवाहन
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील पाच्छापूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या आणि त्याच्या पिल्लांच्या दर्शनामुळे दहशत पसरली आहे. ही दहशत पाहता, वनविभागाने आता ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात रात्रीची गस्त वाढवण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी विविध ठिकाणी जनजागृतीचे फलक लावण्यात येत आहेत. याबरोबर समाज माध्यमांवर व व्हाट्सअप ग्रुपवर शेअर केले जात आहेत.
पाच्छापूरसह आजूबाजूच्या आसानवाडी, पोटलज आणि धोंडसे या गावांमध्ये बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. याची दखल घेत वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेटी देऊन पगमार्क्सची पाहणी केली आहे. तसेच, बिबट्याशी आमनासामना झाल्यास काय करावे, याबद्दल ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. गावातील मुख्य चौक आणि वर्दळीच्या ठिकाणी माहितीपर फलक लावून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
वनविभागाने सुचवलेल्या उपाययोजना
रात्री किंवा पहाटे घराबाहेर पडणे टाळा. अत्यावश्यक असल्यास हातात काठी आणि टॉर्च घेऊन किमान 3-4 जणांच्या समूहाने बाहेर पडा.
जंगलातून किंवा शेतातून चालताना मोठ्याने बोलत जा किंवा मोबाईलवर गाणी लावा, जेणेकरून आवाजाने बिबट्या लांब निघून जाईल.
लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नका. रात्रीच्या वेळी दरवाजे घट्ट लावून घ्या.
उघड्यावर शौचास जाऊ नका. बंदिस्त शौचालयाचा वापर करा.
गोठे चहूबाजूंनी बंदिस्त असावेत. कुत्र्यांना साखळीने बांधून ठेवू नका, कारण बिबट्या कुत्र्यांच्या शिकारीसाठी लोकवस्तीत येतो.
घराभोवतालचे गवत आणि झुडपे काढून परिसर स्वच्छ ठेवा, जेणेकरून बिबट्याला लपायला जागा मिळणार नाही.
पाच्छापूर परिसरात बिबट्याचा वावर लक्षात घेता रात्रीची गस्त वाढवली आहे. लोकांमध्ये जनजागृती करत आहोत. नागरिकांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. वनविभागाचे कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. ग्रामस्थांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि बिबट्या दिसल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा. आम्ही ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे कटिबद्ध आहोत.
– विशाल सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सुधागड-पाली






