विद्या विकास शाळेची शहरातून रॅली
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहरात नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. त्या निमित्ताने कर्जत शहरातील विद्या विकास शाळेच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढून आणि पथनाट्य सादर करून कर्जत शहरातील नागरिकांना आवाहन केले.
कर्जत नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम राबविला जात आहे.त्या माध्यमातून राज्य निवडणूक आयोगाने या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता जारी केली आहे. निवडणुकीत अधिक प्रमाणात मतदान व्हावे यासाठी नवनवीन योजना राज्य निवडणूक आयोगाने हाती घेतल्या आहेत. त्यासाठी शासकीय अधिकारी तसेच निवडणूक यंत्रणा यांच्याकडून वेगवगेळे उपक्रम राबविले जात आहेत. मतदानाचा टक्का वाढवणे हे राज्य निवडणूक आयोगाचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील सामाजिक संस्था यांच्याकडून जनजागृती मोहीम राबविण्याची सूचना निवडणूक यंत्रणा यांच्याकडून करण्यात आली आहे. कर्जत नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी डॉ धनंजय जाधव आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी आवाहन केल्यानंतर कर्जत शहरातील महिला मंडळाच्या विद्या विकास शाळेच्या विद्यार्थ्यांनी शहरात रॅली काढून मतदान टक्का वाढावा यासाठी प्रयत्न केला.
कर्जत शहरातील विद्या विकास शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या कार्याध्यक्ष मीना प्रभावळकर, शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहा गाढे, तसेच श्रद्धा मुंढेकर, मेघा पिंगळे, प्रेमा पितळे स्मिता गणवे, आरती कोकरे, अर्चना भुसाळ, सुमिता अहिरराव या शिक्षक वर्गाने विद्यार्थी यांच्यासोबत रॅली मध्ये सहभाग घेतला. नगरपरिषद कार्यालयाच्या बाजूला असलेली विद्या विकास शाळेच्या विद्यार्थ्यांनी रॅलीची सुरुवात केली आणि पुढे ही रॅली हनुमान मंदिर पाटील आळी अशी स्टेशन रस्त्याने मुख्य बाजारपेठेत आली. बाजार पेठेतून पोस्ट कार्यालय येथून श्री कपालेश्वर मंदिर येथे पोहचली. तेथे लोकमान्य टिळक चौकात या विद्यार्थ्यांनी दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सर्वाधिक मतदारांनी मतदान करावे असे आवाहन केले. तेथे पथनाट्य सादर केली त्यावेळी हजर असलेल्या शहरातील नागरिकांनी या मतदार जनजागृती मोहिमेचे कौतुक केले. नंतर ही रॅली पोलिस लाइन मार्गे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक अशी पुन्हा आपल्या शाळेत विसावली.
