सहभागी होण्यासाठी 31 जुलै पर्यंतची मुदत
| तळा | वार्ताहर |
पंतप्रधान पीक विमा योजने मध्ये या वर्षी फक्त एक रुपया भरून सहभागी होता येणार आहे, त्यामुळे तालुक्यातील जास्तीतजास्त शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी करण्याच्या दृष्टीने कृषी विभाग प्रयत्न करीत आहे. या योजनेमध्ये सहभाग घेण शेतकऱ्यांना शक्य व्हावे यासाठी तालुक्यातील विविध गावांमध्ये कॅम्प लावण्यात आले आहेत. तसेच योजनेची प्रचार प्रसिद्धी करण्यात येत आहे जेणे करून योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचेल याचाच एक भाग म्हणून तालुका कृषी अधिकारी कार्यालय व चोलोमंडल जनरल इन्शुरन्स कंपनी यांच्यावतीने प्रचार व जनजागृतीसाठी चित्ररथ गावागावात फिरवण्यात येत आहे.
तळा तहसील कार्यालय येथे जनजागृती चित्ररथाचे तहसीलदार स्वाती पाटील यांनी स्वागत केले.पंतप्रधान पीक विमा योजनेची अधिकाधिक शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी तालुक्यातील गावागावांमध्ये ध्वनिक्षेपकाद्वारे योजनेची संपूर्ण माहिती दिली जात आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना 31 जुलै अखेर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या पिकांना विम्याचे संरक्षण द्यावे, तसेच ई पीक अँपद्वारे पिकाच्या नोंदी सातबारा उताऱ्यावरती कराव्यात असे आवाहन तहसीलदार स्वाती पाटील यांनी केले आहे.
पीक विमाबाबत जागृती चित्ररथ रवाना करताना तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे, निवासी नायब तहसीदार मंगेश पालांडे,महसूल नायब तहसीदार श्रीम.घोगे, मंडळ कृषी अधिकारी सचिन जाधव, विमा तालुका प्रतिनिधी पूजा वरंडे तसेच कृषी व महसूल कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.