विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी प्रीतम म्हात्रेंची जागरुकता

मध्यान्न भोजन बनवणार्‍या किचनची केली पाहणी

। नवीन पनवेल । वार्ताहर ।

गेले काही दिवस पनवेल आणि राज्यातील कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी नागरिकांना स्वतःची काळजी घेण्याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. कोरोना पेशंट ची वाढती रूग्णसंख्या पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून या बाबतीत सतर्क राहण्याचे नुकतेच आवाहन केले. नवीन कोरोनाच्या प्रकारात लहान मुलांना आपण व्हॅक्सिनेशन वर भर दिला पाहिजे आणि त्यांची काळजी घेतली पाहिजे असे सांगण्यात आले. अशा परिस्थितीत पनवेल महानगरपालिकेच्या शाळा ऑफलाइन पद्धतीने सुरू आहेत त्यांना देण्यात येणारे मध्यान्न भोजन हे पुन्हा सुरू झाले होते. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने गुरुवारी पनवेल महानगर पालिकेच्या शाळांना मध्यान भोजन सेवा पुरविणार्‍या अक्षय पात्र फाउंडेशनच्या साईनगर येथील किचनला त्यांनी भेट दिली. अक्षय पात्र फाउंडेशनच्या किचनमधील भाजी धुण्यापासून ते जेवणाचे डबे भरण्यापर्यंतची सर्व व्यवस्था त्यांनी पाहिली. तेथील बनणार्‍या जेवणाच्या गुणवत्तेच्या दृष्टीने सर्व काही उपायोजना पारंपारिक आणि आधुनिक पद्धतीने केल्या जातात याची माहिती संस्थेचे तेथील व्यवस्थापक महादेवन यांच्याकडून समजावून घेतली. गुणवत्तेच्या बाबतीत तिथे घेत असलेल्या सर्व प्रकारच्या उपायोजनांबाबत समाधान व्यक्त केले. तसेच अक्षय पात्र फाउंडेशन च्या मार्फत संपूर्ण भारत देशात जी अन्नसेवा दिली जाते त्याचे कौतुक सुद्धा केले.

आपल्या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिकणार्‍या अठराशे ते दोन हजार विद्यार्थ्यांना रोज येथून जेवण बनवून पुरविले जाते. सध्याचा कोरोना काळ पाहता आरोग्याच्या दृष्टीने लहान मुलांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून उपाय योजना करण्यात येत आहेत. या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना मिळत असलेले भोजन ज्या ठिकाणी बनते त्या ठिकाणची पाहणी मी स्वतः जाऊन केली. -प्रीतम जनार्दन म्हात्रे, विरोधी पक्षनेते , पनवेल महानगरपालिका

Exit mobile version