| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत नागाव पर्यटन संस्था व रोटरी क्लब ऑफ अलिबाग सी शोअर यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि.13) नागाव वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी नागावकरांनी नागाव हायस्कुल ते नागाव हटाळे बाजार अशी रॅली काढत स्वच्छ नागावसाठी पुढाकार घेतला. या रॅलीत नागावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, इतर मान्यवर आणि विद्यार्थ्यांसह असंख्य नागरीक उपस्थित होते.
जगाच्या नकाशावर पर्यटनात्मक दृष्ट्या अत्यंत नावलौकिक मिळवलेल्या नागावला अधिक सुंदर व स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने नागावकर यावेळी स्वयंस्फूर्तीने एकवटले होते. या वॉकेथॉनमध्ये स्वच्छ नागावचा नारा देत कचरा व्यवस्थापनाचे महत्व पटवून दिले. तसेच, सदृढ व निरोगी आरोग्यासाठी चालणे किती महत्वाचे आहे, हे देखील यावेळी सांगण्यात आले. यावेळी झिरो वेस्ट मॅनेजमेंट संकल्पना साकार करण्यासाठी ओला व सुका कचरा विलगीकरण करून इतरत्र कुठेही न टाकता घंटा गाडीचा वापर करण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले. या रॅलीत सहभागी झालेल्यांना छत्री व सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.







