| नेरळ | प्रतिनिधी |
रस्त्यावरील वाढते अपघात रोखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी नेरळ पोलीस ठाणे आणि जिल्हा वाहतूक शाखा यांच्या वतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेला बळ देण्यासाठी मालेगाव-नेरळ येथील निलेश सुभाष भोईर यांनी सामाजिक बांधिलकी जपत वाहतूक नियमांचे प्रबोधन करणारे माहिती फलक पोलीस प्रशासनाला भेट देण्यात आले आहेत.
नेरळ पोलीस ठाण्यामध्ये हे फलक पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. दरम्यान फलकांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. कर्णकर्कश सायलेन्सर मोटारसायकलला लावून आवाज करणाऱ्यांवर 10,000 रुपये दंडाची तरतूद, मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांवर ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह विरुद्ध 10,000 रुपये दंडाचा इशारा तसेच मनो पार्किंगफ क्षेत्रात वाहन उभे केल्यास 500 ते 1500 रुपयांपर्यंतचा दंड. आशा सर्व दंडांचे फलक हे देण्यात आले. सामाजिक बांधिलकी दाखवत निलेश भोईर आणि दीपाली भगत यांनी हे फलक पोलीस ठाण्याला भेट दिले आहेत. यापूर्वी त्यांच्या माध्यमातून कर्जत एसटी आगारासाठी देखील प्रवासी मार्गांचे फलक देण्यात आले होते. याप्रसंगी प्रभारी अधिकारी राहूल वरोटे, नितिन मंडलीक, नितिन आहेरे, युवराज साळुंखे, निलेश भोईर, दिपाली भगत उपस्थित होते. या उपक्रमाचे कौतुक केले असून, नागरिकांनी दंडाच्या कारवाईला घाबरण्यापेक्षा स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले आहे.
नेरळ पोलीस ठाण्यास जनजागृती फलकांचे वाटप
