गतीमंद मुलांसाठी जागरुकता कार्यक्रम

। रोहा । वार्ताहर ।

येथील ग्रेगोरियन स्पेशल स्कूलने पालेखुर्द गावात विशेष मुलांसाठी जागरूकता वाढवण्यासाठी एक उपक्रम आयोजित केला आहे. संध्याकाळी साडेसहा वाजता यलो या मराठी चित्रपटाचे प्रदर्शन गावकर्‍यांसाठी करण्यात आले आहे.

यलो हा चित्रपट गौरी गाडगीळ यांच्या प्रेरणादायक सत्यकथेवर आधारित आहे. गौरी ही विशेष गरजा असलेली मुलगी असून तिने चित्रपटात स्वतःचीच भूमिका साकारली आहे. या कार्यक्रमाला ग्रेगोरियन कम्युनिटीचे खजिनदार फेबिन वर्गीस, मुख्याध्यापिका कविता साळुंखे, प्रशासक आशीष जेम्स, तसेच निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्कच्या समाजकार्य प्रशिक्षणार्थी शेरॉन एल्झा साजी, दिशा गायकवाड आणि रोहित पालवे आदी जण उपस्थित होते. याशिवाय स्वयंसेवक सिबिन जेकब, अथुल जोमन, दर्शन साळुंखे आणि सिंथिया तिर्की यांनी कार्यक्रमात आपले योगदान दिले.

कविता साळुंखे यांनी 150 लोकांच्या उपस्थितीत महिलांशी, मुलांशी आणि विशेष गरजा असलेल्या मुलांच्या पालकांशी संवाद साधला. त्यांनी विशेष मुलांच्या अडचणी आणि त्यांना समजून घेण्याचे महत्त्व स्पष्ट केले, तसेच त्यांच्या प्रगतीसाठी समाजाकडून अधिक पाठिंब्याचे आवाहन केले. येथील ग्रेगोरियन स्पेशल स्कूलच्या दोन विशेष गरजा असलेल्या विद्यार्थी याच गावात राहतात. त्यामुळे पालेखुर्द गावाची निवड करण्यात आली आहे. चित्रपटासोबत शाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध उपक्रमांचे एक छोटे व्हिडिओ प्रदर्शनदेखील करण्यात आले. गावकर्‍यांनी आणि पालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. अनेकजण चित्रपटाच्या कथेशी स्वतःला जोडून भावुक झाले. चित्रपटानंतर शाळेच्या सहकार्‍यांनी व प्रशिक्षणार्थिंनी गावकर्‍यांसोबत संवाद साधला. गावकर्‍यांनी या उपक्रमाबद्दल कौतुक व्यक्त केले.

Exit mobile version