पुण्यात उलूक महोत्सवातून जनजागृती
| चौल | प्रतिनिधी |
घुबड या पक्ष्याबाबत असलेलया काही चुकीच्या गैरसमजुती व अंधद्धा दूर करण्याचे काम पुण्याची इला फाऊंडेशन संस्था करीत आहे. घुबडाला भारतात काही ठिकाणी लक्ष्मीचे वाहन म्हणूनही पुजले जाते, तर इंग्लड युरोपियन देशांमध्ये त्याला विजयाचे, समृद्धीचे प्रतीक म्हणूनही अनन्यसाधारण महत्त्व आहे. घुबडाच्या संरक्षणासाठी ‘इला’ काम करीत असून, त्याचाच भाग म्हणून देशभरातील विद्यार्थ्यांसाठी पुणे येथे भारतीय घुबड अर्थात उलूक महोत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. यंदाचे हे महोत्सवाचे सहावे वर्ष होते.
इला हॅबिटॅट, पिंगोरी गाव, ता. पुरंदर, पुणे या ठिकाणी उलूक उत्सवाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. यामध्ये पिंगावरील ग्रामस्थ पुण्याचे अनेक भागांतून तसेच भारतातील नागालँड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान आदी भागांतून अनेक शाळांनी आपला सहभाग नोंदविला. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर विवेक खांडेकर, डॉ. ए.के. झा, डॉ. नवीन कुमार पांडे, डॉ. सुरोजी पांडे, पिंगोरी गावचे सरपंच प्रकाश शिंदे, शिंदे, मुख्याध्यापक शिक्षक महासंघाचे सचिव अध्यक्ष नंदकुमार सागर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक करताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश पांडे यांनी घुबडांविषयी समाजामधील असलेली प्रतिमा तसेच अनेक गोष्टी सखोलपणे विशद केल्या. निसर्गातील महत्त्वाची भूमिका बजावणारा ‘उलूक’ म्हणजेच घुबड हा पक्षी संकटात सापडला आहे. अंधश्रद्धा काळी जादू, तस्करी आणि शिकारीमुळे या पक्ष्यांची शिकार होत आहे. धक्कादायक बाब अशी की, तळागाळातल्या अशिक्षित स्तरापासून ते श्रीमंत उच्चभ्र लोकांपर्यंत घुबड पकडण्याच्या बेकायदा प्रकारांमध्ये सहभाग असल्याची नोंद गुन्हे विभागाने केली आहे.
डॉ. सुरुची पांडे कार्याध्यक्ष इला फाउंडेशन यांनी यावेळी दिल्या जाणाऱ्या ‘अरण्यानी’ या पुरस्काराविषयी सविस्तर माहिती दिली. जंगलामध्ये एक वेगळा प्रकारचा सुवास आणि हळुवार स्पर्श करणारा जंगलाचा वारा तसेच पानांच्या हालचालीचे वेगळे आवाज हे सगळे वनदेवतेचे अस्तित्वाची जाणीव करून देणारे घटक आहेत. त्या वनदेवता,‘अरण्यानी’ या नावाने हा दिला जाणारा पर्यावरण पुरस्कार जाहीर केला.
यावेळी अनेक शाळांनी नाट्यमंचावर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. वासुदेव, पिंगळा, गोंधळ या पारंपारिक लोककलेतून तसेच विद्यार्थ्यांच्या गीत गायन नृत्य वादन या सादरीकरणातून घुबड संवर्धनाबद्दल जनजागृती मोठ्या प्रमाणात झाली आहे. या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन राहुल लोणकर, सचिन शिंदे, माऊली खोमणे, राजकुमार पवार आधी सदस्यांनी केले.
तस्करी चिंतेची बाब
वन्यजीव संरक्षण कायदे अंतर्गत संरक्षण असतानाही घुबडांची भारतभर तस्करी सुरू आहे. ‘ट्राफिक इंडिया’ या संस्थेच्या अहवालानुसार, दिवाळीदरम्यान भारतात किमान 75 हजार घुबडांची जादूटोणा आणि अंधश्रद्धा, पाळण्यासाठी किंवा परप्रांतात अवैध व्यापारासाठी तस्करी केली जात आहे. याबाबतची माहिती उलूक महोत्सवाच्या निमित्ताने इला फाऊंडेशन या संस्थेचे अध्यक्ष पक्षी तज्ज्ञ डॉ. सतीश पांडे यांनी व्यक्त केले.
जगभरात 254 प्रकारची घुबडे
जगात एकूण 254 प्रकारची घुबडे असून, कोट्यवधी रुपयाचे शेतीचे नुकसान घुबडांमुळे वाचते. अन्नधान्य म्हणजे भारतातील धनलक्ष्मी देशाचे खरे धन याचे संरक्षण करणारे घुबड हे त्याकरिताच कलकत्त्यामध्ये लक्ष्मीचे वाहन म्हणून पुजले जाते. तर, इंग्लंड आणि काही युरोपियन देशांमध्ये त्याला विजयाचा आणि समृद्धीचे प्रतीक म्हणूनदेखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. या सर्व बहुआयामी जनजागृतीसाठी इला फाउंडेशन पुणे ही संस्था गेल्या अनेक वर्षे घुबडांसाठी विशेष उलूक महोत्सवाचे आयोजन करते आहे. यंदा या महोत्सवाचे सहावे वर्ष आहे.
प्रेमसागर मेस्त्रींचा गौरव
महाड रायगड जिल्ह्यातील लुप्त होत जाणाऱ्या लांब चोचीचे गिधाड आणि पांढऱ्या पाठीचे गिधाड यांचे संवर्धन करणाऱ्या ‘सिस्केप महाड’ संस्थेचे अध्यक्ष प्रेमसागर मेस्त्री यांना सन्मानित करण्यात आले. नेपाळ देशांमधून घुबड या प्रजातींवर देशभर काम करणारे आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आपल्या संवर्धन कार्याचे संशोधन प्रबंध सादर करणारे शास्त्रज्ञ राजू आचार्य शर्मा यांना त्यांच्या कार्याबद्दल गौरवण्यात आले. पुणे येथील आणि सध्या राजस्थान येथे बिबट्या आणि मानव यांच्या संघर्षावर संशोधन करणारे स्वप्निल कुंभोजकर यांनादेखील सन्मानित करण्यात आले. तसेच गेली दहा वर्षे जास्त पर्यावरण संवर्धनाचे काम करणारी संस्था म्हणून “निसर्गप्रेमी मित्र मंडळ“ पेठ वडगाव कोल्हापूर या संस्थेला सन्मानित करण्यात आले.
25 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
दि. 4 ते 6 डिसेंबरदरम्यान उत्साहात साजरा होणाऱ्या या उलूक महोत्सवामध्ये अडीचशेच्या वर शाळा सहभाग घेतात. तर 25 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग या उत्सवामध्ये असतो. यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी घुबडाची चित्रे काढणे, ती रंगवणे त्यांचे विविध साहित्यांनी स्कल्पचर तयार करणे, घुबडांवर नाटिका, नृत्य, गाणे बसवणे अशा अनेकविध ॲक्टिव्हिटीज यानिमित्ताने इला हॅबिटॅट पिंगोरी गाव तालुका पुरंदर पुणे या ठिकाणी आयोजित केल्या जातात. विद्यार्थी भेटीच्या दरम्यान त्यांना या सर्व वस्तूंचे प्रदर्शन तसेच दृकश्राव्य माध्यमातून घुबड जनजागृतीचे संदेश दिले जातात. विद्यार्थ्यांनी काढलेली चित्रे प्रतिकृती, मुखवटे, बुकमार्क, शिल्प अशा घुबडांच्या कलाकृती प्रदर्शनातील विशेष आकर्षण ठरल्या आहेत.
