| पनवेल | प्रतिनिधी |
राष्ट्रीय सुरक्षा अभियानानिमित्त पनवेल शहर वाहतूक शाखा, कळंबोली परिवहन विभाग, कळंबोली वाहतूक शाखा व काळज समाज मध्यवर्ती यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पनवेल रिक्षा विद्यार्थी वाहक संस्थेच्या सहकार्याने जनतेमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यासाठी भव्य स्कूल व्हॅन व बस रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
ही रॅली खांदेश्वर शिवमंदिर, आदई तलाव, नवीन पनवेल सिग्नल, वीर सावरकर चौक ते पनवेलमधील काळज समाज हॉल या मार्गावरून काढण्यात आली. या रॅलीमध्ये पनवेल शहर वाहतूक शाखेची पीटर मोबाईल, पनवेल बीट मार्शल वाहन, कळंबोली वाहतूक शाखेची पीटर मोबाईल तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय कळंबोली यांची सरकारी वाहने, अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते. यासोबतच पनवेल विद्यार्थी वाहक संस्थेच्या सुमारे 35 ते 40 स्कूल बसेस रॅलीत सहभागी झाल्या होत्या. या रॅलीची सांगता काळज समाज हॉल येथे करण्यात आली. त्यानंतर याच ठिकाणी वाहतूक नियम मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पनवेल शहर वाहतूक शाखेचे पोलीस हवालदार अमीर मुलाणी, युवराज येळे, महेंद्रसिंग राजपूत, महेंद्र गळवी, सचिन बुधवंत आदी अंमलदार तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक, पनवेल विद्यार्थी वाहक संघटनेचे चालक, सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार विक्रांत पाटील यांनी उपस्थितांना वाहतूक सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन करत वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन केले. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने यांनी विद्यार्थ्यांशी व पालकांशी थेट संवाद साधत वाहतूक नियम पाळण्याचे महत्त्व स्पष्ट केले. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे होणाऱ्या अपघातांचे सांख्यिकी विश्लेषण सादर करून जनजागृती करण्यात आली.
पनवेलमध्ये जनजागृती स्कूल बस रॅली
