रूपाली ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल
। मुंबई । प्रतिनिधी ।
बीडमधील मोर्चानंतर अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या व्हॉट्सअप चॅटचा एक स्क्रीनशॉट सोशल मीडियावर पोस्ट केला होता. मात्र, तो स्क्रीनशॉट खोटा असल्याचे सांगितले जाते आहे. दरम्यान, याप्रकरणी रुपाली ठोंबरे यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले की, माझ्या खोट्या व्हॉटसअॅप चॅटचा स्क्रीनशॉट वायरल करणार्यांविरुद्ध शनिवारी मी बीडमधील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा (एफआयआर) दाखल केला आहे. कर नाही तर डर कशाला? असे जितेंद्र आव्हाड यांनी पोस्टमध्ये सांगितले आहे. दरम्यान, शनिवारी जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भातील वादग्रस्त चॅट रुपाली ठोंबरे यांनी शेअर केले होते. ‘उद्याचा मसाला तयार ठेव शिवराज.. मी पहिली तुझी भेट घेईन, त्यानंतर मोर्चाकडे… मुंडेंविरोधात आणि वाल्याविरोधात (वाल्मिक कराड) जे जे असेल ते सर्व गोळा कर पैसे लागले तर मला फोन कर, पण मटेरियल तयार ठेव… तुझा फोन लागत नाहीये सकाळपासून प्रयत्न करतोय. हे चॅट जितेंद्र आव्हाडांच्या नावाने व्हायरल करण्यात आले होते.
तसेच, मोर्चात मुस्लिम आणि दलितांनाही गोळा करता आलं तर करा, पैशांची काळजी करु नका… आंबेडकरी चळवळीतील दीपक केदार म्हणून माझा माणूस आहे, त्याला ही संधी द्यावी, मी सांगितले आहे, कसे काय कुणावर बोलायचे.. कसा मंत्री राहतो आणि अजित (अजित पवार) याला कसा पक्षात ठेवतो ते बघू आता.’ असंही या चॅटमध्ये म्हटले होते. हे चॅट व्हायरल झाल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनीही हे चॅट खोटे असल्याची प्रतिक्रिया दिली होती. या संदर्भात रूपाली ठोंबरे यांच्याव्यतिरिक्त आणखी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. विक्रांत फड, रेखा फड, कृष्णा धानोरकर, बिभीषण अघाव, आकाश चौरे आणि सौरभ आघाव अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या अन्य सहा जणांची नावे आहेत.
