जिल्ह्यात अवतरली अयोध्या नगरी; रामभक्तांचा उत्साह शिगेला

मंदिरांमध्ये दर्शनासाठी भक्तांची गर्दी

| रायगड | खास प्रतिनिधी |

अयोध्यानगरीतील श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रायगड जिल्ह्यातील वातावरण राममय बनले होते. जिल्ह्यातील सर्व 15 तालुक्यांतील रामभक्तांची नजर अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठेकडे लागली होती. जिल्ह्यातील हजारो मंदिरे या तेजोमय सोहळ्याचे साक्षीदार झाली. दर्शनासाठी भक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यामध्ये जिल्ह्यातील काही राममंदिरांचाही समावेश होता. विविध मंदिरांत विशेष पूजा आणि महाआरती करण्यात आली. रामभक्त सोहळ्याच्या उत्साहात न्हाऊन निघाले होते.

श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे ठिकठिकाणच्या चौकांमध्ये थेट प्रक्षेपण पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी रामभक्तांनी जय श्रीरामाचा जयघोष केला. सर्वजण भक्तीरसात तल्लीन झाल्याचे दिसून आले. ठिकठिकाणी श्रीरामाच्या कटआऊट्‌‍स उभारण्यात आले होते. काही घरांवर रामध्वज उभारुन, घरांना, इमारतींना विद्युत रोषणाई केली होती. चौका-चौकांमध्ये आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. विविध मंदिरांमध्ये महाआरती तसेच महाप्रसादाचे आयोजन केले होते. भगव्या पताका, भगवे ध्वज आदींमुळे जिल्हा भगवेमय बनला होता.

सोहळ्याला कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अलिबाग शहरामध्ये तरुणांनी बाईक रॅली काढली होती. बाईकवर श्रीरामाचे चित्र असलेले भगवे झेंडे लावल्याचे दिसून आले. लहान मुलांनी राम, सीता, ल्क्ष्मण, भरत आणि हनुमान यांचा पोशाख परिधान केला होता. त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

सोहळ्याचे थेट प्रक्षेपण
अलिबाग शहरातील मारुती नाका, रामनाथ मंदिर आणि एचपी पेट्रोल पंपावर मोठी एलईडी स्क्रीन लावली होती. त्यावर आयोध्येतील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. ते पाहण्यासाठी रामभक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.
80 फुटांची भव्य रांगोळी
कर्जत पंचायत समितीचे माजी सभापती अमर मिसाळ यांच्या संकल्पनेतून नेरळ येथे 80 फूट श्री रामाची रांगोळी साकारण्यात आली होती. तब्बल 48 तास खर्चून ही मनमोहक रांगोळी चित्रकार खाडे यांनी साकारली आहे. यासाठी त्यांना त्यांच्या पत्नीचे सहकार्य लाभले.
विविध कार्यक्रमांचे आयोजन
अलिबाग सराफ संघटनेने श्रीरामाला अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी गरिबांना 208 लाडूंचे वाटप केले. पेण, पनवेल, उरण, खालापूर, कर्जत, रोहा, पाली, माणगाव यासह अन्य तालुक्यांमध्ये लाडू, प्रसादाचा शिरा, फळांचे वाटप करण्यात आले. काही मंदिरांतून भजन, कीर्तन, आरती, दीपोत्सव, गायन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
Exit mobile version