एसटी कामगारांच्या घोषणांनी आझाद मैदान दुमदुमले

। मुंबई । वृत्तसंस्था ।
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं बिरोबाच्या नावानं चांगभलं खंडोबाच्या नावानं चांगभलं अशी घोषणाबाजी करत एसटी कामगारांनी संपूर्ण आझाद मैदान दणाणून सोडलं. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात राज्य सरकार चालढकलपणा करत आहे. त्यामुळे आम्ही परिहन मंत्री अनिल परब यांना साडी चोळी देणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत परब यांच्या बंगल्यावर आम्ही धडक देणारच असा निर्धार व्यक्त करत एसटी कामगारांनी संपूर्ण आझाद मैदान परिसर दणाणून सोडला. हजारोच्या संख्येने एसटी कामगार एकवटल्याने या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे म्हणून एसटी कामगारा गेल्या 12 दिवसांपासून संप करत आहे. त्यामुळे राज्यातील वाहतूक व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. गेल्या 12 दिवसांपासून हजारो एसटी कामगार आझाद मैदानात येऊन थांबले आहेत. दुसरीकडे राज्य सरकारसोबतच्या चर्चेतून संपाचा तोडगा निघताना दिसत नाही. त्यामुळे अनिल परब यांना साडी चोळी देणार असल्याचं एसटी कामगारांनी जाहीर केलं होतं. एसटी कामगार अनिल परब यांच्या बंगल्यावर धडकणार असल्याने त्यांना पाठिंबा देण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्याही आझाद मैदानात आले होते. त्यातच आझाद मैदानात अचानक पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. पोलिसांनी बॅरिकेटींग करून तटबंदी उभी करून आंदोलकांना मैदानाबाहेर जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे आंदोलक अधिक आक्रमक झाले होते.

Exit mobile version