अन्यायग्रस्त अधिपरिचारिकांच्या न्यायासाठी बी.जी. पाटीलांचे बेमुदत उपोषण सुरू 

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
  प्रशिक्षण पूर्ण केलेल्या अधिपरिचारिकाना नियमाप्रमाणे १८ महिन्यांची शासकिय नियुक्ती मिळावी या मागणीसाठी समाज क्रांती आघाडी  संघटनेचे जिल्हा अध्यक्षा बी.जी. पाटील यांनी मंगळवारपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 

आरोग्य विभागातील संबंधित शासकिय व प्रशासकिय पदाधिकारी व अधिकारी यांच्या अन्यायी भूमिकेमुळे २०१७ मध्ये प्रशिक्षणास सुरूवात केलेल्या बंधपत्रीत अधिपरिचारीका यांनी २०१९-२० मध्ये आपले प्रशिक्षण यशस्वीपणे पुर्ण करून उत्तीर्ण होऊनसुध्दा नियमाप्रमाणे १८ महिन्यांच्या शासकिय नियुक्ती आदेशापासून त्या गेले १० महिन्यापासून वंचित आहेत. मात्र पुणे विभागातील त्याच बँचच्या अधिपरिचारिका यांना १८ महिन्यांचे शासकिय नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत व सन २०१६ मधिल बँचच्या अधिपरिचारीका यांनासुध्दा नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत. मात्र २०१७ मधिल १५ प्रशिक्षित अधिपरिचारीका बेरोजगारी व उपासमारीमुळे न्यायासाठी वणवण फिरत आहेत. संबंधित शासकिय व प्रशासकिय अधिकारी निद्रिस्त व बेफिकिर आहेत असे का?  त्यांना न्याय हक्क मिळून देण्यासाठी  दि. १५ फेब्रुवारी २०२२ रोजी पासून आपण जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग येथे बेमुदत उपोषणास सुरू केले आहे, असे रायगड जिल्हा समाज क्रांती आघाडी संघटनेचे अध्यक्ष बी. जी. पाटील यांनी सांगितले. बी.जी. पाटील यांना संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते,  परिचारिका आणि पालकांचाही पाठिंबा आहे.

Exit mobile version