बाबरची कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी

| लाहोर | प्रतिनिधी |

पाकिस्तानचा स्टार बॅटर बाबर आझम याने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडल्यावर आता विराट कोहलीच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. पाकिस्तानच्या मैदानात सुरु असलेल्या तिरंगी टी-20 मालिकेत बाबर आझमने झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात अर्धशतकी खेळीसह विराट कोहलीच्या रेकॉर्डची बरोबरी साधली. आता आणखी एका अर्धशतकासह तो रोहित पाठोपाठ आता विराट कोहलीला मागे टाकण्याच्या उंबरठ्यावर आहे.

आंतरारष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकाचा विक्रम हा विराट कोहलीच्या नावे आहे. किंग कोहलीनं छोट्या फॉरमॅटमध्ये 38 अर्धशतके झळकावली आहेत. 2010 ते 2024 या कालावधीत 125 सामन्यातील 117 डावात किंग कोहलीनं ही कामगिरी नोंदवली होती. बाबर आझमनं या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. 134 व्या सामन्यातील 127 व्या डावात बाबर आझमनं आंतरराष्ट्रीय टी-20 मधील 38 वे अर्धशतक झळकावले. आता एका अर्धशतकासह तो हा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे करू शकतो.

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड बाबर आझमच्या नावे आहे. रोहित शर्माला मागे टाकत तो या यादीत अव्वलस्थानी पोहचला होता. बाबर आझमनं 134 सामन्यात 38 अर्धशतकासह 3 शतकांच्या मदतीने 4392 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. 2024 च्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या रोहित शर्मानं आपल्या टी-20 कारकिर्दीत 159 सामन्यात 4231 धावा केल्या आहेत. यात त्याने 32 अर्धशतकासह 5 शतके झळकावली आहेत.

Exit mobile version