। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
डॉ. राजेंद्र चांदोरकर यांच्या बाबाची सोनपरी या व्हीडीओ अल्बमला पुणे येथील नॅशनल आरकाइव्हज ऑफ इंडिया येथे पार पडलेल्या मुंबा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये प्रथम पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
मराठी फिल्म इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते विक्रम गोखले व मोहन आगाशे यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांनी त्यांच्या सौ व कन्येसोबत स्वीकारला. सलग दुसर्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये हे पारितोषिक त्यांना मिळाले. यापूर्वी जुलै महिन्यात औरंगाबाद येथे एका फिल्म फेस्टिवलमध्ये याच अल्बमला पहिला नंबर मिळाला असे त्यांनी यावेळी नमुद केले.
या व्हिडीओ साँगमध्ये एक सर्व सामान्य पित्याने आपल्या कन्येला प्रतिकूल परिस्थितीत अभ्यासाबरोबरच स्पोर्ट्समध्ये नैपूण्य मिळविण्यासाठी केलेली धडपड तर कन्येने पित्यासाठी केलेला त्याग व त्याचबरोबर त्यांचे एकमेकांविषयी असलले संवेदनशील नाते सादर केले आहे.
डॉ. राज प्रॉडक्शन्सच्या बॅनरतर्फे निर्मितीस उतरलेले हे गाणे स्वतः डॉ. चांदोरकर यांनी गायले आहे. त्यात त्यांनी स्वतः व संवेदना यांनी भूमिका सादर केल्या आहेत. या गीताची गीतरचना व संगीत मनिष अनसुरकर यांचे, चित्रीकरण सुनीत गुरव, रेकॉर्डिंग वरुण भगत, संकलन विशाल गायकवाड तर दिग्दर्शन सचिन कांबळे यांचे आहे. पिता व कन्या यांचे नाते हळुवारपणे मांडणारे व प्रत्येक कन्या व पित्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणणारे हे गीत/व्हिडीओ साँग डॉ राजेंद्र चांदोरकर यांच्या dr rajendra chandorkar youtyube चॅनेल वर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
‘बाबाची सोनपरी’ला प्रथम क्रमांक; इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये गौरव
