सैन्य दलात भरती झालेल्या बाबू नाईकचे स्वागत

कर्जत | वार्ताहर |
कर्जत नगरपरिषद हाद्दीतील दहिवली विभागातील संजय नगरमधील बाबू प्रेमानंद नाईक हा युवक सैन्य दलात भरती झाला. त्याची नाशिक येथील ट्रेनिंग संपवून तो कर्जतमध्ये आला. त्याचे कर्जतकरांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
बाबूला सर्व जण लखन या नावाने ओळखतात. बाबूचे दहावीपर्यंतचे शिक्षण स्वातंत्र्यसैनिक दत्तात्रेय डोंबे विद्या निकेतनमध्ये झाले, तर वाणिज्य शाखेतील 12 पर्यंतचे शिक्षण अभिनव ज्ञान मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात झाले. बाबू मूळ कर्नाटक राज्यातील, परंतु गेल्या 20 वर्षांपासून ते कर्जतमध्ये वास्तव्यात आहेत. बाबूचे वडील प्रेमानंद आणि आई इंदूबाई. बाबूला अगदी कळायला लागल्यापासूनच जवानांबद्दल आकर्षण होते. त्यामुळे आपण सैन्य दलात भरती व्हायचे असे त्याने मनोमन ठरविले होते आणि त्याला त्यासाठी आई-वडिलांचा पाठिंबा होता.
12 वी उत्तीर्ण झाल्यावर बाबू सातारा येथील कमांडो अकादमीत सैनिकी शिक्षणासाठी दाखल झाला. सहा महिन्यांचे शिक्षण झाल्यावर तो मुंबईत येऊन सैन्य दलात भरती झाला. त्यांनतर त्याला ट्रेनिंगसाठी नाशिक येथील अ‍ॅडलरी सेंटरमध्ये पाठविण्यात आले. तेथील खडतर ट्रेनिंग त्याने सहजतेने पूर्ण केली आणि त्याची नियुक्ती पंजाबमधील पटीयाला येथे झाली. त्यानंतर तो कर्जत येथे आपल्या घरी आला. त्याचे कर्जतकरांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

Exit mobile version