| सुधागड-पाली | वार्ताहर |
पाली शहरामध्ये वानर व माकडांच्या टोळ्या मोठ्या प्रमाणात फिरत असतात. शुक्रवारी (दि.23) येथील बाजारपेठेत हॉटेल स्वागत बारसमोरील विद्युत खांबावर एक वानराचे पिल्लू व त्याची आई चढली होती. यावेळी या वानराच्या पिल्लाचा विद्युत तारेला हात लागल्याने त्याला जोरदार शॉक बसला व हे वानराचे पिल्लू थेट रस्त्यावर पडले.
यावेळी वन विभागाच्या कर्मचार्यांना घटनेची माहिती देण्यात आली वन विभागाचे कर्मचारी तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर वानरांच्या टोळीने त्या शॉक लागलेल्या वानराच्या पिल्लाला उचलून नेले. दरम्यान, उपद्रव टाळण्यासाठी तसेच माकड व वानर देखील सुरक्षित राहण्यासाठी वन विभागाने यासंदर्भात योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी पालीतील विदेश आचार्य यांनी केली आहे.