| मुंबई | प्रतिनिधी |
मतेचोरीबाबत आपल्यालाही ऑफर होती, असा खळबळजनक दावा प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी केला आहे. ज्यांची मते मिळणार नाहीत त्यांची नावेच मतदार यादीतून उडवून टाकायची आणि दुसरी 10 हजार नावे घुसवून ती मते आपल्याला मिळतील अशी व्यवस्था करून देण्याची ऑफर आपल्याला विधानसभा निवडणुकीपूर्वी देण्यात आली होती. त्यासाठी तशा दहा हजार लोकांची यादी आपल्याकडे मागण्यात आली होती. वेळ आली तर याचे पुरावा आपण देऊ, असे कडू म्हणाले आहेत.
पुढे बोलताना ते म्हणाले की, निवडणूक आयोग भाजपचा मित्र असल्यामुळे भाजपवाल्यांना मस्ती आली असून हे सर्व आमदार ईव्हीएम मशीनचे पैलवान आहेत. ईव्हीएम व ईडी भाजपने ताब्यात घेतलेल्या संस्था असून सत्ताधाऱ्यांकडून संविधानाची चिरफाड सुरू आहे. सर्व मतदान केंद्रे काढून भाजपच्या कार्यालयातूनच मतदान झाले पाहिजे. माझ्या मतदारसंघात 13 हजार नावे डबल सापडलेली आहेत. सरकारी शाळांमध्ये मतदान केंद्र न ठेवता भाजपच्या कार्यालयांमध्ये मतदान केंद्र ठेवावे. तुमच्यात धमक असेल तर व्हीव्हीपॅट आमच्या हाती द्या, आम्ही त्यावर सही करून मतपेटीत टाकतो. तुमची मर्दानगी असेल तर हे करून पहा, असे आव्हान कडू यांनी दिले आहे.






