। गुहागर । प्रतिनिधी ।
गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची पावसाळ्यात दुरवस्था झाली आहे. यामुळे येथील ग्रामस्थांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच, रस्त्यांच्या दुतर्फा झाडी वाढली असून ही झाडी अपघाताला निमंत्रण देत आहेत. तरी या समस्येंबाबत योग्य तो निर्णय सार्वजनिक बांधकाम उपविभागाने घ्यावा, अशी मागणी वाहनचालकांसह ग्रामस्थांकडून होत आहे.
पावसाळ्यात गुहागर वरचापाट येथे रस्त्यावर पाणी साचत आहे. या रस्त्याला गटारे नसल्याने सर्व पाणी रस्त्यावरच साचते. यामुळे या ठिकाणच्या रस्त्यावर मोठंमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांना वाहने चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. या संदर्भात शुक्रवारी गुहागर रिक्षा संघटनेचे सर्व पदाधिकारी व सर्व रिक्षा चालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन या रस्त्या संदर्भात जाब विचारला होता. या रस्त्यावरून वाहने चालवताना वाहनांच्या दुरूस्तीचा खर्च वाढला असून वाहने खिळखिळी झाली आहेत. गुहागर ते वेलदूर रस्त्याची दुर्दशा झाली असून रस्त्यांच्या दुरवस्थामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तरी रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा. या रस्त्यावरून दुचाकी चालवणे जिकिरीचे झाले आहे. रस्त्यावरील खड्डे चुकवताना अनेक वेळा छोटे-मोठे अपघात झालेले आहेत. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
गुहागर वेलदूर रस्ता दुरुस्तीसाठी 18.89 लक्ष रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. मागील टेंडर डिसेंबर महिन्यात संपले होते. निविदा फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्यांनी दिली आहे.