खड्ड्यांमुळे स्थानिकांसह पर्यटकांची नाराजी
| दिघी | वार्ताहर |
श्रीवर्धन तालुक्यातील तीर्थक्षेत्र हरिहरेश्वरची पर्यटनाच्या नकाशावर प्रसिद्ध धार्मिक स्थळ अशी खास ओळख आहे. त्यामुळे येथील पुरातन मंदिरात भाविकांची तसेच देशी-विदेशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळते. मात्र, मंदिराकडे जाणारा मुख्य रस्त्यातील खड्डेमय प्रवास भक्तांसाठी वेदनादायी ठरत आहे. स्थानिक प्रशासन याकडे दुर्लश करत असल्याने स्थानिकांसह पर्यटकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
हरिहरेश्वर हे ठिकाण ‘दक्षिण काशी’ म्हणुन ओळखले जाते. हे कोकणातील एक सुंदर ठिकाण असून इथले सोळाव्या शतकात बांधलेले हरिहरेश्वरचे प्राचीन मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. या तीर्थ स्थळाच्या प्रवेशद्वारपासून मंदिरापर्यंत जवळपास दोन किलोमीटर अंतरातील रस्त्याची चाळण झाली आहे. याच रस्त्यालगत पर्यटकांसाठी लॉजिंग, हॉटेल तसेच घरगुती राहण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे धार्मिक भावनेने अनवाणी दर्शनासाठी या रस्त्यावरून चालणाऱ्या भक्तांना मंदिराकडे पोहचेपर्यंत मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
त्यातच आता पुढे दिवाळी पर्यटन हंगाम सुरु होत असल्याने पर्यटकांची संख्या आणखी वाढणार आहे. दिवाळी सुट्टीत फिरण्यासाठी अनेक पर्यटक विशेषकरून हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्याला पसंती देतात. समुद्रकिनारा व मंदिराकडे जाणारा मुख्य रस्त्यांवर खड्डे दुरुस्ती होणे आता फार गरजेचे आहे. येथील अरुंद रस्ता व खड्ड्यांमुळे वाहनांची वाहतूक कोंडी होते. त्यामुळे पर्यटक व स्थानिकांमध्ये वाद होण्याच्या घटना घडत असतात. यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन मंदिराला जोडणाऱ्या रस्त्याची डागडुजी करून घ्यावी, अशी स्थानिकांची मागणी आहे.
हरिहरेश्वर येथे विकासाच्या नावावर गेल्या पंधरा वर्षांत शासनाने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत मात्र, अद्यापही अनेक विकासकामे अपूर्ण आहेत. एका बाजूला शासन पर्यटकांच्या वाढीसाठी विविध उपक्रम राबवित आहे, तर दुसऱ्या बाजूला तेच उपक्रम निधी अभावी फोल ठरत असल्याचे हे उदाहरण आहे.
श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथे रस्त्यांसारखी मूलभूत सुविधा मिळाली तर पर्यटकांची संख्या नक्कीच वाढू शकेल. याच रस्त्यावरून पर्यटन ये-जा करत आसतात. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी हा वादग्रस्त विषय बनला आहे. पहिल्यांदा मंदिराकडे जाणारा मुख्य रस्ता दुरूस्ती करणे गरजेचे आहे.
सुयोग लांगी, माजी सरपंच हरिहरेश्वर